पशुधनाच्या वीज अपघाती मृत्यूसाठी महावितरणची नुकसानभरपाई वाढ
पुणे (Livestock Electric Accidental Death) : महावितरणच्या विद्युत वाहिन्या, खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत उपकरणांमुळे झालेल्या अपघातात पशुधनाचा मृत्यू झाल्यास शेतकरी आणि पशुपालकांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. सुधारित निर्णयानुसार गाय, म्हैस, बैल, घोडा आणि गाढव यांसारख्या मोठ्या जनावरांच्या मृत्यूसाठी आता 50 हजार रुपये, तर शेळी, मेंढी आणि वासरांच्या मृत्यूसाठी 5 हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हे अनेक शेतकरी आणि पशुपालकांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. (Livestock Electric Accidental Death) महावितरणच्या विद्युत वाहिन्यांचा संपर्क, विद्युत खांब, रोहित्र किंवा अन्य विद्युत यंत्रणेमुळे अनेकदा पशुधनाचा वीज अपघातात मृत्यू होतो. अशा घटनांमुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन नुकसानभरपाईच्या रकमेत सुधारणा करण्यात आली आहे.
18 वर्षांनंतर नुकसानभरपाईत वाढ
पशुधनाच्या वीज अपघाती मृत्यूसाठी (Livestock Electric Accidental Death) निश्चित करण्यात आलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेत तब्बल 18 वर्षांनंतर वाढ करण्यात आली आहे. वाढती महागाई आणि पशुपालनाचे वाढते आर्थिक महत्त्व लक्षात घेता महावितरणने नुकसानभरपाईच्या रकमेत अनेक पटींनी वाढ केली आहे. त्यामुळे वीज अपघातात पशुधन गमावणाऱ्या शेतकरी आणि पशुपालकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे.
केवळ महावितरणच्या विद्युत यंत्रणेमुळे झालेल्या अपघातांसाठीच मदत
सुधारित नुकसानभरपाई महावितरणच्या विद्युत वाहिन्या, विद्युत उपकरणे किंवा अन्य विद्युत यंत्रणेमुळे झालेल्या अपघातांमध्ये पशुधनाचा मृत्यू झाल्यासच लागू होणार आहे. अन्य कारणांमुळे झालेल्या पशुधनाच्या मृत्यूसाठी ही नुकसानभरपाई लागू होणार नाही.
सुधारित नुकसानभरपाई
- गाय, म्हैस, बैल, घोडा, गाढव : 50,000 रुपये
- शेळी, मेंढी, वासरू : 5,000 रुपये