आंबा चोंढी (Amba-Chondhi Road) : हिंगोली–वसमत या महत्त्वाच्या राज्य महामार्गावरील आंबा-चोंढी शिवारात रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने वाहनचालकांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. रस्त्याच्या मध्यभागी तसेच कडेला पडलेल्या खोल भेगांमुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
हिंगोली आणि वसमत या (Amba-Chondhi Road) दोन प्रमुख शहरांना जोडणार्या या राज्य महामार्गावर दररोज हजारो लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ असते. एसटी बस, रुग्णवाहिका, शालेय वाहने, मालवाहतूक करणारे ट्रक, दूध वाहतूक करणारी वाहने, शेतकरी तसेच व्यापारी मोठ्या प्रमाणावर या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आंबा-चोंढी परिसरात पडलेल्या भेगांमुळे वाहन चालविताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. पावसाळ्यात या भेगांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येणे कठीण होते.
विशेषतः रात्रीच्या वेळी हा धोका अधिक वाढतो. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या (Amba-Chondhi Road) भागात वारंवार लहान-मोठे अपघात घडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी संबंधित विभागाने तातडीने या ठिकाणाची पाहणी करून भेगा बुजवाव्यात, रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच अपघातप्रवण भागात इशारा फलक, रिफ्लेक्टर आणि आवश्यक सुरक्षा चिन्हे बसवावीत, अशी मागणी केली आहे.
राज्य महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करून वाहनचालकांचा जीवित धोका कमी करावा. पावसाळ्यात रस्त्यांची नियमित तपासणी करून खराब झालेल्या भागांची वेळेत दुरुस्ती केल्यास संभाव्य अपघात टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.स्थानिकांच्या मते, संबंधित विभागाने या समस्येकडे प्राधान्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना केल्यास हजारो प्रवाशांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा दिलासा मिळेल.