बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी आक्रमक
आंदोलनाच्या ३ ऱ्या दिवशीही शासन व प्रशासन गप्पच
अंत पाहून नये, राज्यभर आंदोलनाची धग पेटविण्याचा इशारा
मानोरा (Banjara Samaj ST Reservation) : बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे १३ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सामूहिक आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही शासन - प्रशासनाकडून ठोस दखल न घेतल्याने उपोषणकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. उद्यापासून उपोषणकर्त्यांनी पाणीसुद्धा बंद करण्याचा कठोर निर्णय घेतला असल्याचे जाहीर केले आहे.
निसर्ग पूजक बंजारा समाज संपूर्ण भारत देशात एकच धर्म, बोलीभाषा, पेहराव, परंपरा, संस्कृती, परंपरा असताना वेगवेगळ्या राज्यात शासनाने वेगवेगळ्या सुचित समाविष्ट केले आहे. या (Banjara Samaj ST Reservation) मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन बंजारा समाजाला आंध्रप्रदेश, तेलंगाप्रमाणे आरक्षण देण्यासाठी आग्रही,, मागणी केली होती. त्यावेळी पंतप्रधान महोदयांनी आश्वासन सुध्दा दिले होते.
त्या आश्वासनाची आठवण देत बंजारा समाजाला एस.टी. आरक्षण देण्यासाठी तीर्थक्षेत्र पोहरादेवीत सुरू असलेले हे आंदोलन शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने सुरू आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा समाजाच्या शिष्टमंडळाला एसटी आरक्षण संदर्भात बैठक घेऊन सकारात्मकता दाखवली आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने बंजारा समाज न्यायासाठी आक्रमक झाला आहे. त्यासाठी शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपोषणस्थळी अधिकृत प्रतिनिधी पाठवावा, उपोषणकर्त्यांशी चर्चा करावी आणि मागणीवर स्पष्ट व ठोस भूमिका मांडावी.
“व्यक्तीपेक्षा समाज मोठा, श्रेयापेक्षा समाजाची एकजूट मोठी” या भावनेने सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.
संत रामराव बापू यांचे एस.टी. आरक्षणाचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत हा लढा एकजुटीने सुरूच राहील, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे.