प्रेमप्रकरणातून तरुणीची निर्घृण हत्या; करमाड परिसरात खळबळ
छत्रपती संभाजीनगर (Brutal Killing) : जिल्ह्यातील करमाड परिसरात प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावरील शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या २७ वर्षीय पूजा सुदाम गावंडे हिचा तिच्याच प्रियकराने गळा चिरून खून केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पूजा (मुळगाव चित्तेपिंपळगाव, सध्या राहणार कुंभेफळ) ही करमाड येथील पेट्रोल पंपावर नियमितपणे काम करत होती. याच वेळी सत्यम रावसाहेब गावंडे (वय ३२) हा तेथे आला. काही क्षणातच त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने पूजावर हल्ला चढवला. थेट गळ्यावर वार केल्याने पूजा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यामध्ये आरोपी अत्यंत क्रूरपणे हल्ला करताना स्पष्ट दिसत आहे. भरदिवसा, तेही वर्दळीच्या महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावर अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
Chhatrapati Sambhajinagar - A shocking murder has sent shockwaves through the Karmad area in Chhatrapati Sambhajinagar district after a young woman was killed by her boyfriend in broad daylight at a busy petrol pump. The victim was working at the petrol pump as usual when her… pic.twitter.com/aTJ2si6fcY
— NextMinute News (@nextminutenews7) April 9, 2026
प्राथमिक माहितीनुसार, पूजा आणि सत्यम यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये मतभेद वाढले होते. या वादातूनच आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपी सत्यम गावंडे याला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.