दिग्रस बु. : चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आलेगाव येथील आदर्श गोरक्षण संस्थेतून १३ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ सप्टेंबरपासून मुलगी बेपत्ता असून, अद्याप तिचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे.
पांगरताटी येथील एक कुटुंब मागील १०-१२ वर्षांपासून आलेगाव येथील आदर्श गोरक्षण संस्थेत मजुरीसाठी वास्तव्यास आहे. त्यांच्या शेजारी मेहकर तालुक्यातील लोणार येथील एक कुटुंब राहत असल्याचे सांगण्यात आले. गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी पहाटे शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील एका मुलाने अल्पवयीन मुलीला झोपेतून उठवून कुठेतरी नेल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. याबाबत मुलीच्या आईने विचारणा केली असता संबंधित मुलाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला.
याप्रकरणी २५ सप्टेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची, तर २६ सप्टेंबर रोजी संबंधित मुलाविरुद्ध चान्नी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, चार दिवस उलटूनही मुलीचा शोध लागलेला नसल्याने तिच्या आईने तीव्र व्यथा व्यक्त केली आहे.
७२ तासांत शोध न लागल्यास आंदोलनाचा इशारा
घटनेची माहिती मिळताच आदिवासी ग्रामस्थांसह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चान्नी पोलिस ठाण्यात धडक देत ठिय्या मांडला. पोलिसांनी तातडीने आणि प्रभावी कारवाई करून मुलीचा सुरक्षित शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, जिल्हा महासचिव मीनाताई इंगळे, तालुका अध्यक्ष अर्चना डाबेराव तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. पुढील ७२ तासांत मुलीचा शोध न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.