चिखली तालुक्यात पहिल्या सत्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;
आगामी सत्रे १० डिसेंबर व ११ मार्चला
चिखली (Revenue Lok Adalat) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल न्यायालयातील प्रलंबित अर्धन्यायिक दावे व अपीले सामंजस्य आणि तडजोडीने कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
या (Revenue Lok Adalat) अभियानांतर्गत चिखली तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार कार्यालयात १ ऑक्टोबर रोजी आयोजित पहिल्या सत्राला नागरिक व पक्षकारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या सत्रात विविध स्तरांवरील एकूण १४ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. यामध्ये विजय सवडे तहसीलदार चिखली यांच्याकडील ३, महसूल नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांच्याकडील ७, तर निवासी नायब तहसीलदार यांच्याकडील ४ प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आला.
या लोक अदालतीमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत फेरफार वाद व हक्क नोंद तक्रारी, कलम १४३ अन्वये रस्त्यांचे वाद, शेतातील पांदण रस्ते, वहिवाटीचे रस्ते, बांधावरून जाणारे रस्ते, पाणी वहिवाट तसेच शिवरस्त्यांशी संबंधित तंटे यावर दोन्ही पक्षकारांमध्ये समेट घडवून आणण्यात आला. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वादांना सामंजस्याने तोडगा मिळून पक्षकारांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाचण्यास मदत झाली आहे.
दरम्यान, (Revenue Lok Adalat) अभियानाचे दुसरे सत्र १० डिसेंबर २०२६ रोजी, तर तिसरे सत्र ११ मार्च २०२७ रोजी तहसील स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेऊन प्रलंबित महसूल प्रकरणे सामंजस्याने निकाली काढावीत, असे आवाहन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी विजय सवडे यांनी चिखली तालुक्यातील शेतकरी, खातेदार, पक्षकार तसेच वकील बंधू-भगिनींना केले आहे.