सतर्क नागरिक शुभम वानखेडे यांच्या माणुसकीचे व मलकापूर शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक;
५ वर्षीय अक्षद सुखरूप पालकांच्या स्वाधीन
मलकापूर (Malkapur Akshad Missing Case) : एका आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत त्यांचा पाच वर्षांचा चिमुकला खेळता खेळता अचानक दिसेनासा होतो. सुमारे दीड तास काळजाचा थरकाप उडवणारा शोध सुरू असतो... आणि अचानक पोलिसांच्या फोनमुळे त्यांच्या जीवात जीव येतो! आनंद सोसायटी परिसरातील पाच वर्षीय अक्षद अमोल नारखेडे या चिमुकल्याच्या बाबतीत घडलेला हा थरार एका बाजूला भीतीदायक असला, तरी एका सतर्क नागरिकाची माणुसकी आणि मलकापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे या कथेचा शेवट अत्यंत सुखद आणि भावनिक झाला.
खेळता खेळता रस्ता चुकला, मुख्य रस्त्यावर धावून आले संकट
नेहमीप्रमाणे आनंद सोसायटी परिसरात अक्षद सायकल खेळत होता. खेळण्याच्या नादात तो घराचा रस्ता विसरला आणि थेट वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या बुलढाणा रोडवरील मुख्य रस्त्यावर पोहोचला. डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच मोठ्या वाहनांच्या वेगामुळे कुठलीही अघटीत घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.
व्यावसायिकाच्या रूपाने धावून आला 'देवदूत'
अक्षदला त्या गर्दीत आणि धावत्या वाहनांमध्ये घाबरलेल्या अवस्थेत पाहताच, बुलढाणा रोडवरील नर्सरी व्यावसायिक शुभम वानखेडे यांच्यातील माणूस जागा झाला. त्यांनी स्वतःचा व्यवसाय क्षणभर बाजूला सारला आणि कसलाही विचार न करता थेट धावत जाऊन त्या चिमुकल्याला सुरक्षित बाजूला घेतले. अक्षदचे प्राण तर वाचले होते, पण तो प्रचंड घाबरला होता. विचारपूस केली असता त्याने आपले व वडिलांचे नाव सांगितले, मात्र तो घराचा पत्ता सांगू शकला नाही.
मित्राची साथ आणि पोलिसांचे 'मिशन सोशल मीडिया'
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शुभम वानखेडे यांनी आपले मित्र रोहित सातव यांच्या मदतीने अक्षदला तातडीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आणले. ठाण्यात हजर असलेले पोलीस निरीक्षक गणेश गिरी, पोहेकॉ श्याम कपले व मनोज उमाळे यांनी चिमुकल्याला पाहिले आणि कोणतीही वेळ न दावडता तातडीने कारवाई सुरू केली. त्यांनी अक्षदचा फोटो सोशल मीडियाच्या विविध ग्रुप्सवर प्रसारित केला आणि पालकांचा शोध सुरू केला.
अखेर आई-वडिलांच्या डोळ्यातून वाहू लागले आनंदाश्रू
दुसरीकडे, आपला काळजाचा तुकडा घरातून हरवल्यामुळे आई-वडील गेल्या दीड तासांपासून वेड्यासारखे त्याचा शोध घेत होते. सोशल मीडियावरील मेसेज आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे ही माहिती वाऱ्यासारखी पालकांपर्यंत पोहोचली. आई-वडील धापा टाकत पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस ठाण्यात आपल्या पोटच्या गोळ्याला सुखरूप, हसताना पाहताच आई-वडिलांच्या जीवात जीव आला. आपल्या मुलाला छातीशी घट्ट कवटाळताना त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू तिथल्या प्रत्येकाचे मन हेलावून टाकणारे होते. स्वतःचा व्यवसाय बाजूला ठेवून एका अनोळखी बालकाचे प्राण वाचवणाऱ्या शुभम वानखेडे यांच्यातील 'माणुसकीचे' आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून अवघ्या काही वेळात पालकांचा शोध घेणाऱ्या मलकापूर शहर पोलिसांच्या 'तत्परतेचे' संपूर्ण तालुक्यातून भरभरून कौतुक होत आहे.