पूर्णा शहराजवळील घटना; आकस्मिक मृत्यूची नोंद, मयत नांदेड येथील रहिवाशी
परभणी (Parbhani Dead body) : पूर्णा शहरालगतच्या थुना नदीच्या पात्रात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा पाण्याने फुगलेला मृतदेह १२ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या पुर्वी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृतदेह पाण्यावर पालथ्या अवस्थेत तरंगत असून त्यातून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, मयताची ओळख शेख हुसेन शेख इब्राहीम (वय ५५, रा. मुहम्मदीया कॉलनी, देगलूर नाका, इतवारा, नांदेड) अशी पटली आहे. पूर्णा शिवारातील गट क्रमांक ८८ मधील थुना नदीपात्रात हा मृतदेह आढळून आला. स्थानिक शेतकरी कालिदास नागोराव कदम हे आपल्या शेतात गेले असता नदीपात्रातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता पाण्यात मृतदेह तरंगताना दिसून आला.
त्यांनी तत्काळ पूर्णा पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कालिदास कदम यांच्या खबरीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाऊस करीत असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.