14 ते 25 सप्टेंबरदरम्यान 10 मार्गांवर 26 जादा बसगाड्या; गणेशभक्तांना रात्रीच्या प्रवासासाठी मोठा दिलासा
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाढती गर्दी लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत विशेष बदल करण्यात आले आहेत. गणेश मंडळे आणि विसर्जनस्थळी जाणाऱ्या भाविकांना रात्रीच्या वेळी प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी बेस्ट उपक्रमाकडून 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. याच कालावधीत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननेही मेट्रो-3 अर्थात अॅक्वा लाइनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बेस्टच्या वाहतूक विभागाकडून गणेशोत्सव काळात एकूण 10 बसमार्गांवर 26 जादा बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ही विशेष बससेवा रात्री साडेदहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी गणेशदर्शन तसेच गणेश विसर्जनासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय मिळणार आहे.
लालबाग, परळ, गिरगाव आणि खेतवाडी यांसारख्या दक्षिण मुंबईतील गर्दीच्या परिसरांवर बेस्टने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याचबरोबर पश्चिम उपनगरातील गणेशभक्तांसाठीही अतिरिक्त बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.
ओशिवरा, शिवाजीनगर, देवनार, बॅकबे, मुंबई सेंट्रल, वरळी, सांताक्रुझ, वडाळा आणि काळा किल्ला या आगारांमधून जादा बसगाड्यांचे संचालन केले जाणार आहे. ओशिवरा आणि सांताक्रुझपर्यंत अतिरिक्त बसगाड्या धावणार असल्याने रात्रीच्या वेळेत प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा अधिक सहज उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, बेस्टसोबतच मेट्रो-3च्या वेळेतही गणेशोत्सवासाठी वाढ करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या निर्णयानुसार 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान अॅक्वा लाइनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहील.
सध्या कफ परेड आणि आरे जे.व्ही.एल.आर या दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10.30 वाजता सुटते. मात्र गणेशोत्सव काळातील वाढीव वेळेमुळे रात्री उशिरापर्यंत गणपती बाप्पाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना परतीच्या प्रवासासाठी मेट्रोचाही पर्याय उपलब्ध होणार आहे.