हाताळा (Minister Narhari Zirwal) : सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आरोग्यवर्धिनी केंद्रास भेट देऊन तेथील आरोग्य सेवांची पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी आरोग्यवर्धिनी केंद्रातील परिसर स्वच्छता, एएनसी क्लिनिक, प्रयोगशाळा विभाग तसेच इतर आरोग्यविषयक कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. केंद्रातील बाह्यरुग्ण सेवेचा आढावाही त्यांनी घेतला.
यावेळी आयुष्मान भारत कार्डच्या कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड उपलब्ध करून देऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सध्या सुरू असलेल्या ‘तिशीचा पल्ला, तपासणी आणि सल्ला’ या असंसर्गजन्य रोगांच्या १०० दिवसीय विशेष अभियानाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
हे अभियान अधिक प्रभावीपणे राबवून नागरिकांची आरोग्य तपासणी व आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.