गुंडलवाडीत आदिवासी मेळावा उत्साहात
कळमनुरी (Minister Narhari Zirwal) : तालुक्यातील गुंडलवाडी येथे गुरुवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत आदिवासी मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ करण्यात आला. तसेच शासकीय आश्रमशाळा, जामगव्हाण येथे नमो-७३ योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रयोगशाळेचे पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
मेळाव्यास माजी आमदार संतोष टारफे, माजी जि.प. अध्यक्ष गणाजी बेले, बी.डी. बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक माणिक लोढा, उपविभागीय दंडाधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जिवककुमार कांबळे, प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बारसे, गुंडलवाडीचे सरपंच विजय डवरे, लेखाधिकारी जी.व्ही. हिबारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
गुंडलवाडी व परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित होते. महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट असल्याचे सांगत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी कोणताही सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. गुंडलवाडीचे सरपंच विजय डवरे यांनी शासकीय आश्रमशाळांमध्येच इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू करण्याची मागणी केली. तसेच एकलव्य शाळेसाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. आमदार संतोष टारफे यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्याची मागणी करत विशेषतः आदिवासीबहुल गावांमधील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली. आदिवासी कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
मेळाव्याच्या निमित्ताने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरीच्या वतीने चित्ररथ उभारण्यात आला होता. सेवा संकल्प अभियानांतर्गत महसूल प्रशासनाच्या वतीने विविध योजनांची माहिती देणारे स्टॉलही लावण्यात आले होते. यावेळी गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे मेळाव्याला संबोधित करताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. आपल्या आयुष्यातील संघर्षाचा अनुभव सांगताना जीवनात कितीही संकटे आली तरी डगमगून न जाता प्रयत्नांच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे, असा संदेश त्यांनी तरुणांना दिला.