हिंगोली (Hingoli shoplifting) : शहरात सलग दुकानफोडीच्या घटनांनी व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. 5 एप्रिल 2026 रोजी रात्री 9.45 ते 6 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात तीन चोरट्यांनी शहरातील पाच दुकानांचे शटर वाकवून एकूण 33 हजार रुपयांची रोकड लंपास केली. दहा दिवस उलटूनही तपास न लागल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या चोऱ्यांमध्ये चिंतामणी मेडिकलमधून 4,000 रु., अजय मंदाडे यांच्या किराणा दुकानातून 5,000 रु., राहुल वाढवे यांच्या श्रेय डिस्ट्रीब्यूटर्समधून 7,000 रु., साईलीला मेडिकलमधून 7,000 रु. व श्री तुळजाई मेडिकलमधून 2,000 रु. अशी एकूण 33,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोऱ्या झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या (Hingoli shoplifting) पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने बुधवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, उपाध्यक्ष राजेश बगडिया, शहराध्यक्ष सुमित चौधरी यांच्यासह रविंद्र सोनी, माबुद बागबान, शेख मुजीब, शेख जुबेर मामू, राहुल वाढवे, अनिल कोंडेकर, उमेश बोडके व अजय मंदाडे आदी व्यापारी उपस्थित होते.
शिष्टमंडळाने रात्रीची गस्त वाढवण्याची व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावर डॉ. निलाभ रोहन यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला गती देण्यात येईल, तसेच शहरात रात्रीच्या गस्तीत वाढ केली जाईल, असे आश्वासन दिले. अद्याप आरोपींचा सुगावा न लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असून पोलिसांनी ठोस कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.