अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या पथकाची कामगिरी
हिंगोली : बासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. बासंबा शिवारातील बासंबा पाटीजवळ १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ३९ हजार ४० रुपयांची देशी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली एक लाख रुपयांची चारचाकी कार क्रमांक एम एच ०१ सी जे ४०९९ असा एकूण एक लाख ३९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलीस मुख्यालय हिंगोली येथे नेमणुकीस असलेले आणि सध्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे कार्यरत असलेले अर्जुन चंद्रशेखर यादव यांनी बासंबा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शेख उस्मान शेख चाँद रा. माळहिवरा ता. जि. हिंगोली या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशीररित्या त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी रिट्झ कार क्रमांक एमएच ०१ सीजे ४०९९ मधून देशी दारू चोरटी वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून खाकी पुठ्ठ्याच्या सिलबंद बॉक्समध्ये असलेल्या २८८ काचेच्या दारूच्या बाटल्या आणि ४०० प्लास्टिकच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाचा गुन्हा १२ सप्टेंबर रोजी रात्री १०.२१ वाजता दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार डुकरे हे करीत आहे. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेणिक लोढा, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील संदीप पवार, सतीश नरवाडे, विनोद कुटे, अर्जुन यादव यांनी केली आहे.