पुणे : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. १८ जून २०२६ रोजी केतनला लोहगड किल्ल्यावर नेल्यानंतर दरीत ढकलण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपींनी कथित कट आखण्यापूर्वी काही जुन्या हत्याकांडांचा तसेच लोणावळा परिसरातील दरीत घडलेल्या मृत्यूंचा अभ्यास केल्याचे पोलिसांनी दोषारोपपत्रात नमूद केले आहे.
केतनच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांसमोर सिया गोयलने अपेक्षित पद्धतीने दुःख व्यक्त केले नसल्याने संशय निर्माण झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. लोहगडच्या पायथ्याशी कुटुंबीय पोहोचल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यानंतर घरी परतल्यावर सियाने दुःख कसे व्यक्त करावे आणि अधिक दुःखी कसे दिसावे, यासंदर्भात ऑनलाइन माहिती शोधल्याचे डिजिटल पुराव्यांच्या तपासातून आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. Instagram आणि WhatsApp वरील माहिती तसेच अन्य डिजिटल उपकरणांमधील पुरावे जप्त करून ते दोषारोपपत्रासोबत न्यायालयात सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
तपासादरम्यान सियाने केतनला ठार करण्याच्या विविध शक्यतांबाबत ऑनलाइन माहिती शोधल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. यामध्ये अन्नपदार्थातून विषप्रयोगाच्या शक्यतेशी संबंधित शोधांचाही समावेश असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. ‘Mushroom use woman kill family by mushroom’, ‘Is it easy to kill someone’ आणि ‘How to manipulate people’ अशा स्वरूपाचे सर्च आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, या ऑनलाइन शोधांचा प्रत्यक्ष खुनाच्या कटाशी नेमका संबंध काय, हे न्यायालयीन पुरावे आणि सुनावणीदरम्यान स्पष्ट होणार आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, केतनच्या मृत्यूनंतर आरोपींना सुरुवातीला आपण पोलिसांच्या हाती लागणार नाही, असा विश्वास होता. मात्र, कालांतराने अटक होण्याची भीती निर्माण झाल्याचे तपासात समोर आले आहे. या काळात सियाने चेतनला धीर दिल्याचे, तर सियाचा आत्मविश्वास कमी झाल्यानंतर चेतनने तिला सावरण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
चौकशीदरम्यान पोलिसांच्या प्रश्नांना कसे सामोरे जायचे, कोणत्या प्रकारे उत्तरे द्यायची आणि परिस्थितीत घाबरून न जाता कसे वागायचे, याबाबतही ऑनलाइन शोध घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हा शोध रितेशच्या सल्ल्याने करण्यात आल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. अटकेनंतर आरोपी शांत आणि आत्मविश्वासाने वागत असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
'राजा रघुवंशी' हत्याकांडाचाही अभ्यास
पोलिसांच्या तपासानुसार, कथित कटाच्या पार्श्वभूमीवर आरोपींनी 'राजा रघुवंशी' हत्याकांडाचा अभ्यास केला. या प्रकरणातील आरोपींकडून कोणत्या चुका झाल्या आणि तपास यंत्रणेला ते कसे सापडले, यासंदर्भातील माहिती गोळा करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
यानंतर लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या जुन्या मृत्यूंची माहितीही शोधण्यात आली. टायगर पॉइंट आणि लोहगड परिसरात मानसी गोविंदपूरकर या तरुणीचा दरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती आरोपींनी मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
सिया, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांनी सोशल मीडिया तसेच मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून ही माहिती एकमेकांशी शेअर केल्याचे पोलिसांनी दोषारोपपत्रात नमूद केले आहे.