नवरगाव उपवनक्षेत्रातील घटना; वनविभागात खळबळ
सिंदेवाही : नवरगाव-चिमूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत सुमारे दीड वर्षाच्या मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवरगाव बिट-१ मधील कक्ष क्रमांक २३४, पांढरा गोटा परिसरात गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
नवरगाव ते चिमूर हा रस्ता घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने या भागात वन्यजीवांचा सातत्याने वावर असतो. गुरुवारी पहाटेच्या सुमारास पांढरा गोटा शिवारात रस्ता ओलांडताना एका अज्ञात वाहनाने या बिबट्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट गंभीर जखमी झाला होता, उपचारांअभावी काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. मृत बिबट ही सुमारे दीड वर्षे वयाची मादी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर मृत बिबट्याचा मृतदेह सिंदेवाही येथील काष्ठ भंडारात नेऊन तेथे शवविच्छेदन करण्यात आले. उत्तर तपासणीनंतर शासकीय नियमानुसार अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभाग पुढील तपास करत आहे.