धानोरा तालुक्यात प्रसूतीदरम्यान दिव्या रामसिंग उईके यांचा बाळासह मृत्यू; आजाद समाज पक्षाकडून चौकशी व कठोर कारवाईची मागणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अवघ्या १७ दिवसांच्या कालावधीत तिसऱ्या माता-बाल मृत्यूची घटना समोर आली आहे. धानोरा तालुक्यातील दिव्या रामसिंग उईके यांचा प्रसूतीदरम्यान बाळासह मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात यापूर्वीही प्रसूतीदरम्यान माता-बाल मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. २३ ऑगस्ट रोजी चामोर्शी तालुक्यातील जिजा हंसराज सातर, तर २२ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील कोजबी येथील नाजुका दिवाकर राऊत यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांची चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा अशीच घटना घडल्याने आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
एकाच रुग्णालयात अल्प कालावधीत वारंवार माता-बाल मृत्यू होत असल्याने या घटनांकडे केवळ दुर्दैवी प्रसंग म्हणून पाहता येणार नाही, अशी भूमिका आजाद समाज पक्षाने घेतली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ, उपचारांची पद्धत, रुग्णांच्या बाबतीत वेळेत निर्णय घेण्याची क्षमता तसेच आरोग्य विभागातील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदे या बाबींची सखोल तपासणी करण्याची गरज पक्षाने व्यक्त केली आहे.
मागील माता-बाल मृत्यूच्या घटनांमध्ये दोष निश्चित करून कठोर कारवाई झाली असती, तर त्यानंतर आरोग्य यंत्रणा अधिक दक्ष झाली असती, असा दावा आजाद समाज पक्षाने केला आहे. कारवाईचा पुरेसा धाक निर्माण होत नसल्यास प्रशासनातील निष्काळजीपणा कायम राहण्याची शक्यता आहे, असा सवालही पक्षाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
विशेष मागास जिल्ह्यात आरोग्य सुविधांवर खर्च, तरीही मृत्यू का?
गडचिरोली हा विशेष मागास आणि आदिवासीबहुल जिल्हा असल्याने येथील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जातो. मात्र या खर्चानंतरही गरीब, आदिवासी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार उपचार मिळत नसतील, तर सरकारी निधीचा प्रत्यक्ष लाभ कोणाला मिळत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, दिव्या रामसिंग उईके यांच्या माता-बाल मृत्यू प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा रुग्णालय प्रशासनाच्या दरवाज्यातच आंदोलन छेडण्याचा इशारा आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला आहे.