Monsoon Update

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; मुंबईसह अनेक भागांत पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; मुंबईसह अनेक भागांत पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा

Monsoon Update

अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील अनुकूल परिस्थितीमुळे पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे

मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवेत वाढलेले बाष्प आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली अनुकूल वातावरणीय स्थिती यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने किनारपट्टीवर वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून समुद्रात उंच लाटा आणि वेगवान वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे.

अरबी समुद्रात दक्षिणेकडील वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे समुद्रात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. स्थानिक मच्छीमारांच्या माहितीनुसार, पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, मुंबईत शुक्रवारी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. उपनगरांमध्ये अधूनमधून पाऊस पडला, तर मध्य मुंबईत दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. पावसाच्या सरी असूनही हवामानातील दमटपणामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागला.

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सततच्या पावसामुळे नागरिकांची गैरसोय होत असून वाहनचालक, पादचारी आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना रेनकोट आणि छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे.

गडचिरोलीत दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा

गेल्या वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी गडचिरोलीसह जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. पावसाअभावी धान उत्पादक शेतकरी चिंतेत होते. धान पिके करपण्याच्या मार्गावर असल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. मात्र सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रायगडमध्ये भात लावणीच्या कामांना मिळाला वेग

रायगड जिल्ह्यातही आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे. यापूर्वी पावसाला झालेल्या उशिरामुळे शेतकरी चिंतेत होते. त्यातच जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात भातशेतीच्या लावणीच्या कामांना गती मिळाली आहे.

कोल्हापूरमध्ये रिमझिम सरी; दमदार पावसाची प्रतीक्षा कायम

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. शहरात तुरळक पाऊस पडत असला तरी घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. पेरणीनंतर पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पंचगंगा नदीची पाणीपातळी अद्याप उन्हाळ्यातील स्थितीप्रमाणेच कमी असून जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ ५० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

मालेगावच्या जळकू परिसरात ढगफुटीसदृश पाऊस

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जळकू परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. विशेष म्हणजे नाशिकच्या पूर्व भागात इतरत्र पाऊस नसताना केवळ जळकू परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेली, तर पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र या पावसामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

धक्कादायक माहिती! देशात बनावट कीटकनाशकांची बाजारपेठ तब्बल 11 हजार कोटींवर

Counterfeit Pesticide Market: देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नऊ शेळ्या दगावल्याने कुटुंबावर आर्थिक संकट

अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नऊ शेळ्या दगावल्याने कुटुंबावर आर्थिक संकट

Small Farmers Crisis: तालुक्यातील पिंपळदरी येथील भूधारक शेतकऱ्यांच्या नऊ शेळ्या अचानक एका दहा मिनिटात दगावल्याने मोठी आर्थिक हानी झाली असून सदर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Oct 04, 2026