प्रधान सचिव डॉ. पलकुंडवार, पोपटराव पवारांकडून विकासकामांचा आढावा
हिंगोली : ताओ दाटेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पाहणी समितीने ५ सप्टेंबर, शनिवार रोजी पाहणी केली.
समितीचे अध्यक्ष तथा ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पलकुंडवार, आदर्श गाव संकल्पना समितीचे सदस्य पद्मश्री पोपटराव पवार आणि मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गावातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी ग्रामपंचायतीने अभियानांतर्गत केलेली स्वच्छता, जलसंधारण, घनकचरा व्यवस्थापन, ग्रामसभा, करवसुली, पथदिवे, पाणीपुरवठा योजना यांसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची माहिती सादर करण्यात आली. गावातील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांनी योजनांचा लाभ मिळतो का, याची विचारणा केली.
डॉ. पलकुंडवार यांनी दाटेगावमध्ये लोकसहभागातून झालेल्या कामांचे कौतुक केले. तर पोपटराव पवार यांनी आदर्श गावासाठी आवश्यक असलेल्या निकषांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, तसेच सरपंच कन्याकुमारी जगन माने, उपसरपंच गिताबाई माधव माने, अर्चना जगदीश भिसे, अंतकला गिरी, सीताराम माने यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.