सीटवर झोपल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ; अंधेरी GRPकडून FIRची प्रक्रिया, CCTVच्या आधारे आरोपीचा शोध सुरू
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकलमधील एका डब्यात महिलेवर एका पुरुष प्रवाशाने शिवीगाळ करत पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पश्चिम रेल्वेच्या दुसऱ्या श्रेणीच्या सामान्य डब्यात घडली. महिला प्रवासी ट्रेनमधील सीटवर झोपली होती. डब्यात इतर जागा उपलब्ध असतानाही संबंधित पुरुष प्रवाशाने तिच्यावर आक्षेप घेत वाद घातला. त्याने महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर काही वेळाने हा पुरुष प्रवासी तेथून निघून गेला. मात्र, महिलेने त्याला आवाज न वाढवण्यास सांगितल्यानंतर तो पुन्हा तिच्याकडे आला. त्यानंतर त्याने कमरेचा पट्टा काढला आणि महिलेला त्याने मारण्याची धमकी दिल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. यावेळीही तो महिलेला शिवीगाळ करत असल्याचे समोर आले आहे.
या संपूर्ण प्रकारादरम्यान डब्यात अनेक सहप्रवासी उपस्थित होते. मात्र, कोणीही त्या पुरुषाला रोखण्यासाठी पुढे आल्याचे दिसत नाही. त्यापैकी एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mumbai - A shocking incident of assault was reported on a Mumbai local train, where a male passenger allegedly beat a woman inside a compartment, the woman was initially sleeping on a seat when the man attacked her. He reportedly also threatened her by removing his belt.Other… pic.twitter.com/u9UCllJqxa
— NextMinute News (@nextminutenews7) August 7, 2026
घटनेची माहिती समोर आल्यानंतर अंधेरी GRPने FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून संबंधित प्रवाशाचा शोध घेतला जात आहे. व्हिडीओ क्लिप आणि रेल्वे स्थानकांवरील CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी संबंधित पुरुष प्रवाशाची ओळख पटवली आहे. त्याने कोणत्या मार्गाने प्रवास केला, याचा शोध घेण्यासाठी विविध स्थानकांवरील CCTV फुटेज तपासले जात आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांमधील किरकोळ वाद टोकाला जाऊन जीवघेण्या हल्ल्यांपर्यंत पोहोचल्याच्या घटना गेल्या काही महिन्यांत समोर आल्या आहेत. त्यामुळे लोकल ट्रेनमधील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यापूर्वी जानेवारीमध्ये महाविद्यालयीन शिक्षक अलोक कुमार सिंह यांची मलाड स्थानकात उतरण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून सहप्रवासी ओंकार शिंदे याने हत्या केली होती. त्यानंतर जूनमध्ये मुसळधार पावसादरम्यान लोकलच्या डब्याचा दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादात २१ वर्षीय कपड्यांच्या किरकोळ विक्री दुकानातील कर्मचारी मयंक लोहार यांची सहप्रवासी रोशन सुवर्णा याने हत्या केली होती.