नांदेड : जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठे संकट उभे ठाकले आहे. विशेषतः अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी संकटाचा सामना करीत आहेत. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे बाजारभावाची घसरण, यामुळे केळी उत्पादक अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
नांदेड जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकरी संकटात
गेल्या काही दिवसांत अनेक शेतांमध्ये केळीची झाडे उभी असतानाच घडातील केळी अचानक पिवळी पडून पिकू लागली आहेत. शेतकऱ्याने महिनोन्महिने केलेली मेहनत, पाणी, खते, औषधे आणि मजुरीवर खर्च केलेला पैसा डोळ्यांसमोर वाया जाताना पाहण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
शेतकऱ्याची अवस्था तर आणखी गंभीर आहे. केळीचा बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरला असून तो सध्या साधारण ५०० ते ६०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आल्याचे शेतकरी सांगत आहेत. एवढ्या कमी भावात केळी विकल्यावर उत्पादन खर्च तर दूरच, माल काढणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना शेतातील केळी काढण्यासाठी उलट घरातून पैसे खर्च करावे लागत आहेत. म्हणजेच पिकवलेला माल विकून पैसा मिळण्याऐवजी माल काढण्यासाठीच शेतकऱ्याला पैसा खर्च करण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती केवळ बाजारभावाची समस्या नाही. उभ्या पिकावर अचानक पिवळेपणा येणे, केळी अकाली पक्व होणे किंवा पिकावर रोगराई वाढणे यामागील नेमकी कारणे शोधणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
हवामानातील बदल, तापमानातील चढ-उतार, पावसातील अनियमितता, जमिनीतील बदल किंवा एखादा रोग यापैकी नेमके कारण काय आहे, याचा शास्त्रीय पद्धतीने शोध घेण्याची गरज आहे.