नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; १५ हजार ३५३ क्यूसेकने पाणी सोडले
परभणी (Parbhani Godavari River) : पाथरी तालुक्यातील ढालेगाव आणि तारुगव्हाण उच्च पातळी बंधार्यातून गोदावरी नदी पात्रात १५ हजार ३५३ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोमवार १० ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास तारुगव्हाण उच्च पातळी बंधार्याचे एक गेट उघडण्यात आले. या गेटमधून नदीपात्रात ८ हजार ५६१ क्युसेकने पाणी येत आहे. तर दुपारी पावणे दोनच्या सुमारास ढालेगाव उच्च पातळी बंधार्याचे एक गेट उघडण्यात आले असून ६ हजार ७९२ क्युसेकने गोदावरी नदीपात्रात पाणी येत आहे. तारुगव्हाण बंधारा ९२ टक्के भरला असल्याने या बंधार्याचे एक गेट उघडण्यात आले आहे. (Parbhani Godavari River) बंधार्यात येणार्या पाण्याच्या आवकनुसार सोडण्यात आलेल्या पाण्यामध्ये वाढ, घट करण्यात येणार आहे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करु नये, कुठलीही जीवित व वित्त हानी होऊ नये या करीता प्रशासकीय स्तरावरुन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.