महाबीज प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारवाई; शेतकऱ्यांच्या तक्रारींना न्याय
पातूर (Substandard Seeds Case) : पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याच्या तक्रारींनंतर दोन वेगवेगळ्या बियाणे कंपन्यांविरुद्ध पातूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाबीज बियाणे विश्लेषण प्रयोगशाळा, अकोला येथून प्राप्त झालेल्या अहवालात संबंधित बियाणे अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पहिल्या प्रकरणात (अप. क्र. 352/2026) तालुका कृषी अधिकारी महादेव श्रीराम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदूर (मध्य प्रदेश) येथील ऑस्कर सिड्स प्रा. लि. या कंपनीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955, बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968 तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 ते 14 जुलै 2026 या कालावधीत शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
दुसऱ्या प्रकरणात (अप. क्र. 353/2026) पंचायत समिती पातूर येथील बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी जयंत सहदेव सोनोने यांच्या फिर्यादीवरून मध्य प्रदेशातील ओस्वाल सिड्स अँड केमिकल्स लि. या कंपनीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, बियाणे कायदा, बियाणे नियम तसेच बीएनएस कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 28 जून ते 3 जुलै 2026 दरम्यान प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या आधारे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांची पेरणी करूनही उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार होती. महाबीज बियाणे विश्लेषण प्रयोगशाळेच्या अहवालात बियाणे अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कृषी विभागाने पोलिसांकडे कायदेशीर तक्रार दाखल केली. त्यानुसार पातूर पोलिसांनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.