मुरूम-खडी टाकण्यास सुरुवात, मात्र श्रेयवादाचे राजकारण तापले!
पातूर (Patur Road Pothole) : पातूर शहरातील अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रेस्ट हाऊस रस्त्यावरील शाहाबाबू शाळेजवळ पडलेल्या जीवघेण्या खड्ड्याबाबत ‘दैनिक देशोन्नती’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच, निद्रिस्त प्रशासनाला अखेर जाग आली आहे. या बातमीची गंभीर दखल घेत प्रशासकीय यंत्रणा तातडीने हरकतीत आली असून, रविवारी/सोमवारी जेसीबी, यंत्रसामग्री आणि कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन खड्ड्यामध्ये मुरूम व खडी टाकून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
रेस्ट हाऊस रस्ता (Patur Road Pothole) हा दिवाणी न्यायालय, भूमी अभिलेख कार्यालय, शासकीय विश्रामगृह, शाहाबाबू शाळा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांना जोडणारा मुख्य मार्ग आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर साचलेल्या पाण्यामुळे व खड्ड्यामुळे अपघातांची मालिका सुरू झाली होती. अनेक नागरिक व वाहनधारक यामध्ये पडून जखमी झाले होते. ‘देशोन्नती’ने या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधत नागरिकांच्या जीवाशी चाललेला खेळ चव्हाट्यावर आणला होता.
बातमीचा धडाका बसताच प्रशासनाने तत्परता दाखवत दुरुस्तीचे काम सुरू केले खरे; मात्र काम सुरू होताच स्थानिक राजकीय वर्तुळात श्रेय लाटण्याची चढाओढ सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. "हे काम आमच्याच पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे झाले," असा दावा करत विविध राजकीय नेते व कार्यकर्ते श्रेयवादाच्या शर्यतीत उतरले आहेत.
प्रशासनाच्या या अस्वस्थ धडपडीमुळे आणि श्रेयवादाच्या नाट्यामुळे, "वर्षानुवर्षे पडलेल्या खड्ड्याकडे दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन 'देशोन्नती'च्या बातमीनंतरच का जागे होतात?" असा रोखठोक सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 'देशोन्नती'च्या वृत्तामुळे अखेर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होत असल्याने परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी ‘देशोन्नती’चे विशेष आभार मानले आहेत.