शांतता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे यांचे आवाहन; सोशल मीडियावरील अफवांपासून सावध राहण्याच्या सूचना
चिखली : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत उत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी चिखली पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेश मंडळांनी आवश्यक परवानग्या घेणे, स्वयंसेवकांची नियुक्ती करणे, सीसीटीव्ही व विद्युत सुरक्षेची काळजी घेणे, विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करणे तसेच ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले.
चिखली पोलीस स्टेशन येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, तहसीलदार विजय सवडे, पोलीस निरीक्षक भूषण गावंडे, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, नगराध्यक्ष पंडितदादा देशमुख, सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव पाटील, बांधकाम विभागाचे कड, पंचायत समितीचे गजानन पोफळे, अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयसिंग राजपूत, रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोळंके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत वृक्ष देऊन करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवात सामाजिक सलोखा व शांतता राखण्यासाठी विविध मान्यवरांना ‘शांतिदूत’ आणि जलदूत म्हणून ओळख देण्याचा उपक्रमही यावेळी जाहीर करण्यात आला.
यावेळी विलास यामावार यांनी मंडळांनी ऑनलाइन परवानगी घेणे आवश्यक असून, गणेश मंडळांनी उत्सवापूर्वी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक परवानग्या घेण्याचे सांगितले. मंडप उभारण्यात येणारी जागा नगरपरिषद, ग्रामपंचायत किंवा खासगी मालकीची असल्यास संबंधितांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. रस्त्यावर मंडप उभारताना वाहतुकीसाठी पुरेशी जागा मोकळी ठेवावी, मंडपाचा आकार शक्यतो मर्यादित ठेवावा, अशी सूचना त्यांनी केली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत जोडणी सुरक्षित पद्धतीने करावी. मंडपातील पत्रे किंवा लोखंडी साहित्यामध्ये विद्युत प्रवाह उतरून दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मंडळांनी जनरेटर बॅकअप ठेवावा तसेच दिवसभर मंडपात स्वयंसेवकांची उपस्थिती ठेवावी. यासाठी चार स्वयंसेवकांची दिवसनिहाय जबाबदारी निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले.
देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याने शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर किंवा अन्य वाहनांची आरटीओकडून फिटनेस तपासणी करून घ्यावी आणि अनुभवी व सक्षम चालकाची नियुक्ती करावी, असेही सांगण्यात आले.
सोशल मीडियावर अफवा पसरवू नका
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत विशेष इशारा दिला. गणेशोत्सवाच्या काळात सोशल मीडिया पोस्ट, व्हॉट्सॲप संदेश किंवा इंस्टाग्रामवरील माहितीची खात्री केल्याशिवाय त्यावर प्रतिक्रिया अथवा कमेंट करू नये. संशयास्पद पोस्ट आढळल्यास पोलीस, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.
ध्वनिक्षेपक आणि डीजेच्या वापराबाबत शासनाने व न्यायालयाने निश्चित केलेल्या ध्वनीमर्यादेचे पालन करावे. पारंपरिक ढोल, लेझीम आणि इतर पारंपरिक कलांना प्राधान्य देण्याचे आवाहनही अमोल गायकवाड यांनी केले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन
मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी नगरपरिषदेकडून विसर्जन मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, स्पीड ब्रेकर हटविणे, स्ट्रीट लाईट व सीसीटीव्हीची दुरुस्ती तसेच विसर्जनस्थळी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे सांगितले. शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्यात येणार असून, मोकाट जनावरांचा त्रास होऊ नये यासाठी नगरपरिषदेची पथके तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पर्यावरणपूरक, सामाजिक संदेश देणारे आणि नाविन्यपूर्ण देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळांचे परीक्षण करून त्यांची नावे जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडून बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनीही चिखलीला प्लास्टिकमुक्त करण्याच्या उपक्रमाला गणेश मंडळांनी हातभार लावावा, असे आवाहन केले.
धार्मिक सलोखा ही चिखलीची ओळख
नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी चिखली शहरातील हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा अधोरेखित केली. गणेशोत्सव, रेणुका माता उत्सव, विविध धार्मिक मिरवणुका आणि इतर सण उत्सव सर्व समाजबांधव एकत्रितपणे साजरे करतात. ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, असे त्यांनी सांगितले.
गणेश मंडळांचे प्रतिनिधी दीपक खरात, सागर पुरोहित, श्रीराम झोरे, गणेश बरबडे, रफिक शेठ यांच्यासह अन्य मान्यवरांनी विविध सूचना मांडल्या. गणेश मंडळांना प्रशासनाकडून प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात यावीत, विसर्जन मार्गावरील विद्युत तारांची सुरक्षितता तपासावी, पोलीस चौकी ते श्रीराम नागरी पतसंस्थेच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, तसेच विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रशासनाने अधिक समन्वय ठेवावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी पंडित दादा देशमुख, रामदास देव्हडे, डॉ. मोहम्मद इसरार, सलीम मेमन, रामेश्वर सोळंकी, सुधीर चेके, समाधान गाडेकर, सुहास शेटे, नंदू कराडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना शांतिदूत म्हणून चिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम वाकतकर तर आभार प्रदर्शन पीएसआय शरद भागवतकर यांनी केले.
चिखली शहराची शांतता, सामाजिक सलोखा आणि गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.