गौरीपाडा परिसरातील घटना; पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण जखमी, आरोपी राहुल तायडे अटकेत
कल्याण: कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात पोलिस कर्मचाऱ्यावर मद्यधुंद तरुणाने केलेल्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरिकांच्या तक्रारीवर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर लाकडी काठीने हल्ला करण्यात आला. या मारहाणीत पोलिस कर्मचारी जखमी झाले असून संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Kalyan - A shocking incident unfolded in the Gauripada area of Kalyan West when a drunken youth attacked a police officer with a stick. The entire assault was captured on CCTV cameras and has since gone viral on social media. Residents of the area alerted the police control room… pic.twitter.com/wMDGrHGGPW
— NextMinute News (@nextminutenews7) July 27, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, गौरीपाडा परिसरात एक मद्यधुंद तरुण घराबाहेर उभा राहून मोठ्याने आरडाओरडा करत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर खडकपाडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिस कर्मचारी गणेश चव्हाण यांनी गोंधळ घालणाऱ्या राहुल तायडे याला शांत करण्याचा आणि थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांच्याशी वाद घालत अचानक लाकडी काठीने हल्ला चढवला. या हल्ल्यात गणेश चव्हाण जखमी झाले.
या प्रकरणानंतर खडकपाडा पोलिसांनी आरोपी राहुल तायडे याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. दरम्यान, हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून या घटनेमुळे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.