मध्यरात्री विषारी सापाने केला दंश; दोन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर, प्रशासनाकडून तपास सुरू
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात मध्यरात्री विषारी सापाने दंश केल्याची थरारक घटना घडली. रात्रीचे जेवण आटोपून वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना सापाने दंश केला. या घटनेत उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, उलटी व मळमळीचा त्रास होत असल्याने आणखी १४ विद्यार्थिनींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

तालुका मुख्यालयापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर जपतलाई येथे ही अनुदानित आश्रमशाळा आहे. प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री दांडेकारेटा जातीच्या विषारी सापाने वसतिगृहातील झोपलेल्या विद्यार्थिनींना दंश केला. घटनेनंतर संबंधित विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थिनींची नावे सुष्मिता सरोजीत मंडल (१४, इयत्ता आठवी, रा. मेंढरी, ता. एटापल्ली), दीपिका ऐतवा लकडा (१२, इयत्ता सहावी, रा. जवेली, ता. एटापल्ली) आणि अनु गजूराम कोरेटी (७, इयत्ता दुसरी, रा. केहकावाई, ता. धानोरा) अशी आहेत.

सर्पदंशाच्या घटनेनंतर वसतिगृहातील इतर विद्यार्थिनींच्या प्रकृतीचीही तपासणी करण्यात आली. १४ विद्यार्थिनींना उलटी आणि मळमळ होत असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोन विद्यार्थिनींची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जपतलाई येथील ही अनुदानित आश्रमशाळा गडचिरोली आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत चालविली जाते. वसतिगृहात घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, वसतिगृहातील सुरक्षाव्यवस्था, साप वसतिगृहात नेमका कसा शिरला आणि विद्यार्थिनींना सर्पदंशाची घटना कोणत्या परिस्थितीत घडली, याबाबत प्रशासनाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि सर्पदंशाबाबतची अधिकृत माहिती संबंधित प्रशासनाच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.