‘अजितदादा आमच्या हृदयात’ म्हणत जगतापांचे प्रत्युत्तर; 83 उमेदवार निवडणूक रिंगणात, तीन पॅनलमध्ये थेट लढत
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. राष्ट्रवादीतून बंडाची भूमिका घेतलेले नेते पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ मैदानात उतरवले आहे. त्यामुळे कारखाना निवडणुकीतील राजकीय समीकरणे चांगलीच रंगली आहेत.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांचे नाव न घेता स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवून दाखवण्याचे आव्हान पुरुषोत्तम जगताप यांना दिले होते. जगताप यांनी या आव्हानाला प्रत्युत्तर देताना अजित पवारांचे नाव आपल्या पॅनलच्या प्रचारात वापरणार असल्याचे स्पष्ट केले.
जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधताना कारखान्याचा विकास आणि सभासदांचे हित या मुद्द्यांवरून आपण वेगळी भूमिका घेतल्याचे सांगितले. अजित पवार हे आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या आव्हानावरही भाष्य केले. अजित पवारांना सभासदांच्या मनातून आणि आपल्या हृदयातून कोणीही दूर करू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अजित पवारांचा फोटो हटवला, पण नावावर ठाम
दरम्यान, सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्या लेटरहेडवरून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. अजित पवारांचे नाव किंवा छायाचित्र वापरण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांची अधिकृत परवानगी घेण्याचे आवाहन या पत्रकातून करण्यात आले होते.
यानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी वानेवाडी येथे आयोजित केलेल्या प्रचार मेळाव्यातील अजित पवारांचा फ्लेक्स हटवला. मात्र, फोटो काढण्यात आला असला तरी अजित पवारांचे स्थान आपल्या मनात कायम असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. त्यामुळे निवडणूक प्रचारात अजित पवारांच्या नावाच्या वापरावरून दोन्ही बाजूंमध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.
601 अर्जांपासून 83 उमेदवारांपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर आता निवडणुकीतील अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे.
निवडणुकीसाठी एकूण 601 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर त्यापैकी 514 अर्ज पात्र ठरले. त्यानंतर तब्बल 431 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात 83 उमेदवार राहिले आहेत.
कारखान्याच्या निवडणुकीत एकूण तीन पॅनल आमनेसामने आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल निवडणूक लढवत आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक पॅनल मैदानात असून, भाजपच्या पाठिंब्याने पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील पॅनलही निवडणूक रिंगणात आहे.
तीनही पॅनलनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला असून, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कोणाचे पारडे जड ठरते, याकडे आता बारामती तालुक्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.