जवळा बाजार (Goat theft case) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार पोलिसांनी आठवडी बाजार परिसरात धडक कारवाई करत चोरीच्या सात शेळ्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक केली. आरोपींकडून सात शेळ्या, एक चारचाकी वाहन आणि तीन मोबाईल असा सुमारे ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथून शेळ्या चोरल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिस निरीक्षक एस. पी. डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, हेड कॉन्स्टेबल राजेश ठाकूर, दिलीप नाईक, विष्णु चव्हाण, वसंत चव्हाण, दिनकर पोले, अंबादास बेले यांच्या पथकाने आठवडी बाजार परिसरात गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली.
बाजारात विक्रीसाठी उभ्या करण्यात आलेल्या सात शेळ्यांबाबत संशय आल्याने संबंधितांकडे चौकशी करण्यात आली. आरोपींनी शेळ्या वाहनातून आणल्याचे सांगितले; मात्र त्यांच्या मालकीचे कोणतेही वैध कागदपत्र अथवा समाधानकारक स्पष्टीकरण सादर करता आले नाही. जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून सात शेळ्या, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन आणि तीन मोबाईल असा एकूण साडेतीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात अजय सुभाष पवार ( रा. बोरी, ता. जिंतूर, जि. परभणी), कार्तिक सुभाष पवार रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) आणि आदित्य सुभाष भोसले (, मूळ रा. डोणगाव, ता. मेहकर, जि. बुलढाणा, सध्या रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा) यांना अटक करण्यात आली आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी दुसरबीड येथून शेळ्या चोरल्याची कबुली दिली असून, या टोळीने यापूर्वीही पशुधन चोरीचे गुन्हे केले आहेत का, तसेच या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा जवळा बाजार पोलीस सखोल तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्ह्यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पशुधन चोरी करणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा गुन्ह्यांवर प्रभावी आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.