नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास; नगरपालिकेचा एक कर्मचारी जखमी
हिंगोली : शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवर एक गाय पिसाळल्यासारखी वावरत असून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर मारायला धावत होती. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
या गंभीर बाबीची माहिती १३ सप्टेंबर, रविवार रोजी मिळताच प्रभागातील काही नागरिकांनी नगरसेविका सौ. सोनाली गोटरे व माजी नगरसेवक विशाल गोटरे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ नगरपरिषद प्रशासनाला सदरील गायीचा बंदोबस्त करण्याबाबत कळविले.
यावरून मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी तात्काळ दखल घेत स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह नगरपरिषदेच्या पथकाला घटनास्थळी रवाना केले. नगरपरिषदेच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून या पिसाळलेल्या गायीला ताब्यात घेतले.
ही गाय ताब्यात घेत असताना नगरपरिषदेचे कर्मचारी दिनेश वर्मा यांना किरकोळ दुखापत झाली. अखेर गायीला ताब्यात घेतल्याने ग्रामीण पोलीस स्टेशन रोडवरील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून नगरपरिषदेच्या तात्काळ कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या मोहिमेत नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील दिनेश वर्मा, सुधाकर मोकाटे, काशिनाथ लग्गड, सतीश सोनवणे आणि नागेश चव्हाण यांनी सहभाग नोंदवला.