शाळांमध्ये 23 ते 30 एप्रिल दरम्यान 11.30 वाजेपर्यंत शाळा भरवीण्याचे दिले होते निर्देश
गडचिरोली (Zilla Parishad School) : विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतरही 23 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचे निर्देश जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. यासाठी (Zilla Parishad School) शाळांना विशेष वेळापत्रक देखील तयार करून देण्यात आले होते. मात्र उन्हाची तीव्रता व त्यातच अनियमित बस सेवेमुळे बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी दुपारचे 2 वाजत असल्याने प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात देशोन्नती ने 23 एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित केले होते. अखेर शिक्षणाधिकाऱ्यांनी एक पत्रक काढून 24 एप्रिल पासून शाळा सकाळी 7 ते 10.30 या वेळेत भरविण्याचे निर्देश दिले आहेत.
सध्या विदर्भात हिट वेव्ह आहे. त्यातच गडचिरोलीचा पारा 43 अंशापर्यंत पोहोचला आहे. विदर्भाचा पारा लक्षात घेता अनेक जिल्हा प्रशासनाने शाळा सकाळी 7 ते 10:30 वाजेपर्यंतच भरवीण्याचे सक्त निर्देश शाळांना दिले आहेत. मात्र गडचिरोली जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या संकलित चाचण्या संपल्यानंतरही विद्यार्थ्यांना तात्काळ सुट्टी न देता त्यांना शाळेत उपस्थित ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. या (Zilla Parishad School) कालावधीत विद्यार्थ्यांसाठी सकाळी 11.30 वाजेपर्यंत खेळ, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सर्जनशील उपक्रम राबविण्यावर भर द्यावा तसेच संबंधित उपक्रमांचे नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करून त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते.
मात्र सध्या सकाळपासूनच उन्हाची तीव्रता प्रचंड वाढत आहे. त्यातच (Zilla Parishad School) शाळेतून 11.30 वाजता सुट्टी झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना भर उन्हात पायदळ किंवा सायकलने घरी जावे लागते.तर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बसची ताटकळत वाट बघत बसावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी दुपारचे 2 वाजत आहेत.अशा परिस्थितीत चिमुकल्या विद्यार्थ्यांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न देशोन्नती ने 23 एप्रिल रोजी च्या अंकात उपस्थित केला होता. अखेर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने उन्हाची तीव्रता लक्षात घेता सकाळी 10.30 पर्यंतच शाळा भरवीण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयाचे विद्यार्थ्यांसह प्रशासनाने स्वागत केले आहे.