औराद शहाजानी (Latur):- गेल्या तीन-चार दिवसांपासून लातूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून लातूर जिल्हा गारठला आहे दरम्यान लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी (ता. निलंगा) व परिसरात थंडीचा कडाका पुन्हा वाढला असून तापमानाची पातळी ६ अंश सेल्सिअसवर आली आहे.
भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका दररोज वाढत असल्याने दैनंदिन जनजीवनावर परीणाम झाला आहे. औराद शहाजानी येथील जलविज्ञान प्रकल्पामध्ये शुक्रवार दि.१४ डिसेंबर रोजी १०.५ अंश सेल्सिअस, शनिवार दि.१५ डिसेंबर रोजी ८ अंश सेल्सिअस तर दि.१६ डिसेंबर रोजी ६ अंश सेल्सिअसची नोंद झाल्याची माहिती मुक्रम नाईकवाडे यांनी दिली आहे. औराद व परिसरात तेरणा व मांजरा या दोन्ही नद्यांवरील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे थंडीचा कडाका खूप प्रमाणात वाढला आहे आणि दिवसेंदिवस तापमान (temperature)झपाट्याने घटत आहे. याचा दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम झालेला आहे. सकाळी उशिरापर्यंत लोक बाहेर पडणे टाळत आहेत. तरीही सकाळी क्लास व कामासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांकडून जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. तसेच थंडीपासून बचावासाठी गरम कपड्यांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे असे कपड्यांचे व्यापारी मल्लिकार्जुन लातुरे यांनी माहिती दिली.
थंडीचा रबी पिकांना चांगल्या प्रकारचे हवामान उपलब्ध झालेले आहे. पण भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम म्हणून तापमानात पुन्हा घट होत आहे. थंडीमुळे लहान बालके व वृद्ध यांचे आजारी पडण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे.