औसा पोलिसांनी 24 तासांत केला चोरीचा मुद्देमाल हस्तगत
लातूर (Latur):- औसा येथील एमआयडीसी (MIDC) मधून चोरी गेलेले 100 क्विंटल सोयाबीन अखेर पोलिसांच्या सतर्कतेमुळे शोधण्यात यश आले. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. चोरीचे सोयाबीन ताब्यात घेतले असून ते लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधितांना परत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
16 लाखांच्या सोयाबीनची चोरी..!
औसा एमआयडीसी मधील गोडाऊन मधील 4 लाख 39 हजार 200 रुपयांच्या 100 क्विंटल सोयाबीनची (Soyabean)चोरी झाली होती. अज्ञात चोरटे 200 कट्टे सोयाबीन दोन वाहनांमध्ये टाकून चोरटे पसार झाले होते. याबाबत तक्रार दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड यांच्या नेतृत्वातील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे यांच्या पथकाने तत्काळ तपासाची चक्रे फिरवत 200 कट्टे सोयाबीन आणि एक आयशर टेम्पो व एक बोलेरो जीप जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी अभिषेक सुहास यादव, (वय 21, वर्ष राहणार वसवाडी, पाखरसांगवी), अभय अवधूत भोळे, (वय 22 वर्ष, राहणार व वसवाडी, पाखरसांगवी), मनोज राजू खताळ, (वय 22 वर्ष, राहणार माऊली नगर, पाखरसांगवी तालुका जिल्हा लातूर) व हनुमंत भैरवनाथ मुंडे, (वय 39 वर्ष), (राहणार टाकळी शिराढोण जिल्हा धाराशिव) यांना अटक केली आहे. चोरीस गेलेले सोयाबीन व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव, सहायक फौजदार कांबळे, पोलीस अमलदार गुट्टे, मुबाज सय्यद, तुमकुटे, चामे, पाटील, भंडे, मगर यांचा समावेश होता.