जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
भंडारा (Bachu Kadu Andolan) : विधानसभा निवडणुकीच्यावेळी जाहीर सभांमध्ये सत्ताधार्यांनी आमचे सरकार सत्ते आले कि शेतकर्यांचा सातबारा कोरा करु, शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य भाव देऊ, दिव्यांगांच्या मानधनात वाढ करु, असे विविध प्रलोभर देऊन शेतकर्यांची दिशाभूल करुन सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर मात्र सत्ताधारी सरकारला आश्वसासनांचा विसर पडला. या व इतर विविध मागण्यांना घेऊन दि.८ जून पासून बच्चू कडू (Bachu Kadu Andolan) यांचे मोझरी येथे अन्न त्याग आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ दि. १३ जून रोजी भंडारा येथे प्रहार संघटनेच्यावतीने विरुगिरी आंदोलन करण्यात आले.
सरकार स्थापन होऊन सहा-सात महिन्यांचा कालावधी लोटला. या कालावधीत दोन अधिवेशन झाले. अनेकदा मंत्री मंडळाच्या बैठका होऊनही सरकार कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी निर्णय घेत नाही. त्यासाठी (Bachu Kadu Andolan) बच्चू कडू यांनी वारंवार रायगडाच्या पायथ्याशी, आमदारांच्या घरासमोर टेंभा आंदोलन, मंत्र्यांच्या घरी रक्तदान शिबिर अशा प्रकारचे विविध आंदोलन करुनही सरकार दखल घेत नसल्याने दि.८ जून पासून मोझरी येथे अन्न त्याग आंदोलन सुरु केले आहे.
त्यांच्या समर्थनार्थ दि.१३ जून रोजी भंडारा शहरामध्ये खात रोडवरील पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन करण्यात आले. अंकुश वंजारी व शेतकर्यांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विनोद वंजारी, उमेश गभणे, चारुल रामटेके, तुषार मेंढे, आदेश मेश्राम, चिंतामण तिघुळे, गुलाब बारई, संजय थोटे, विजय हटवार, कार्तिक चौधरी, बंडू वैरागडे, रविंद्र गभणे, चंद्रशेखर दुरुपकर आदि उपस्थित होते.
काय आहेत मागण्या?
दिव्यांग, विधवा महिलांना ६ हजार रुपये मानधन देण्यात यावा, शेतकरी कर्ज मुक्त करुन धानाला हमीभाव देण्यात यावा, शेतकर्यांची शेती पेरणीपासून ते कापणीपर्यंतची कामे मनरेगाच्या माध्यमातून करण्यात यावे, घरकूल लाभार्थ्यांना शासनाने ठरविलेल्या अनुदानात बदल करुन किमान ५ लक्ष रुपये निश्चित करण्यात यावे, धान खरेदी केंद्रावर कायमस्वरुपी माहिती फलक लावण्यात यावा, गोसे धरणाचे अपूर्ण कालवे नहराच्या शेवटी नदीला जोडून टेलिंगची कामे पूर्ण करण्यात यावी.
शेतकर्यांना मिळणारा वीज पुरवठा रात्रीला न देता दिवसा देण्यात यावा, कामगारांचे ऑनलाईन नोंदणी कार्यालय तसेच साहित्य वाटप तालुकास्तरावर उपलब्ध करुन देण्यात यावे, जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी, एक्सरे मशीन, इसीजी सुविधा उपलब्ध करुन डॉक्टर नियुक्त करावे, शहरी आणि ग्रामीण भागातील अतिक्रमण धारकांचा सातबारा व गावनमुना ८ वर पट्टे देऊन भोगवटदार मालक, असे देण्यात यावे. शेतकर्यांच्या पिकाचे वन्यप्राण्यांपासून बंदोबस्त करण्यात यावा, पालांदूर (चौ.) बायपासचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे व इतरही मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.