कर्मचार्यांचा अभाव, व्यवहारांमध्ये अडथळे
दोन महिन्यापासून शाखा व्यवस्थापकच नाही
आंधळगाव/पालडोंगरी (Bank of India) : आंधळगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या दोन महिन्यांपासून शाखा व्यवस्थापक नसल्यामुळे खातेदारांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. आधीच कर्मचार्यांचा अभाव असतांना शाखा व्यवस्थापक पद रिक्त असल्याने कामकाजावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येते.
बँकिंग व्यवहार सुरळीत करण्यासाठी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे रहावे लागत असून शेतकरी, कामगार, निवृत्त पेन्शनधारक, महिला बचत गट तसेच इतर खातेदारांची रोजच दमछाक होत आहे. नगदी व्यवहार, कर्ज प्रस्ताव, कागदपत्रे पडताळणी अशा महत्वाच्या कामांचा खोळंबा होत असल्यामुळे खातेदारांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. (Bank of India) शाखेत शाखा व्यवस्थापक नसल्याने कर्ज प्रस्ताव मंजुरीस विलंब होत आहे. यामुळे शेतकर्यांच्या शेतीकामावर परिणाम होत असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खातेदारांच्या म्हणण्यानुसार, ‘शाखेत फक्त मोजकेच कर्मचारी असून कामाचा मोठा ताण आहे. व्यवस्थापक पद तातडीने भरले नाही तर खातेदारांना रोजच्या येणार्या अडचणीमुळे स्वतःचे खाते बंद करण्या पलीकडे दुसरा मार्ग उरणार नाही. (Bank of India) बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ लक्ष घालून शाखा व्यवस्थापक व कर्मचार्यांची संख्या वाढवून द्यावी, अशी मागणी शाखेतील खातेदारांनी केली आहे.