Thanegaon accident case :- नियतीच्या मनात काय असते आणि जीवनात कधी कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल काही सांगत येत नाही. याचीच प्रचिती रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येलाच म्हणजे दि. ८ ऑगस्ट शुक्रवारला रात्री ७ ते ७. ३० वाजताच्या सुमारास आली. दि. ९ ऑगस्टला भावा -बहिणींच्या अतुट प्रेमाचे प्रतिक असलेल्या रक्षाबंधनाचा (Rakshabandhan)सण असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. परंतू नियतीच्या मनात काही वेगळेच होते.आरमोरी – गडचिरोली मार्गावर नवीन ठाणेगांव जवळ झालेल्या अपघातात (Accident) भावाला आपला हात गमवावा लागला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला झाला अपघात
ठाणेगाव येथील रामेश्वर जिवन नैताम ( ३०) याने आरमोरी येथे बर्याच दिवसांपासून लहान -मोठ्या वाहनांचे टायर पंक्चर दुरूस्तीचे दुकान टाकले आहे. आपल्या दुकानाच्या आधारावरच तो आपल्या कुंटूबाचा उदरनिर्वाह करीत होता. नेहमीप्रमाणे रामेश्वर दिवसभर आपले पंक्चर दुरुस्तीचे काम करून रात्री ७ ते ७ .३० वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकी वाहनाने ठाणेगाव येथील आपल्या घरी येत होता. या दरम्यान नविन ठाणेगाव जवळ आल्या नंतर एका अज्ञात वाहनाने रामेश्वर याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे रामेश्वर रस्त्यावर जाऊन पडला. त्याचवेळेस अज्ञात वाहनाचे एक चाकही रामेश्वर याच्या उजव्या हातावरून गेले . त्यामुळे हाताचा अक्षरक्ष चेंदामेंदा झाला. सोबतच दुसर्या दुचाकीने येत असलेल्या देऊळगाव येथील मच्छिंद्र सहारे यालाही त्याच अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले होते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नागरिकांनी लगेच आरमोरी पोलीस ठाण्यात माहिती दिली व दोघांनाही आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले.
आपल्या उमेदीच्या काळात आयुष्यभर एका हाताने दिव्यांगाचे आयुष्य जगावे लागणार
आरमोरी येथील प्राथमिक उपचारानंतर दोघांच्याही नातेवाईकांनी गंभीर अवस्थेत असलेल्या दोघांनाही ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु रामेश्वर नैताम याच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याने तेथील डॉक्टरांनी रामेश्वर याच्या हातावर शस्त्रक्रिया(Surgery) केली. डॉक्टरांनी हात कापण्याचा निर्णय घेऊन हात कापला. त्यामुळे मोठ्या कष्टाने आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी दुकान थाटलेल्या एका लघु व्यावसायिकाला ऐन आपल्या उमेदीच्या काळात आयुष्यभर एका हाताने दिव्यांगाचे आयुष्य जगावे लागणार आहे. त्यामुळे त्याच्यावर व कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.
रामेश्वर विवाहित असून त्याला पत्नी,एक मुलगी , आई-वडील, बहीणी , भाऊ व बराच मोठा परिवार आहे. ऐन रक्षाबंधनाच्या पुर्व संध्येलाच रामेश्वर याचा हात नियतीने हिरावून घेतल्याने रामेश्वर यांच्या कुटुंबावर व त्यांच्या बहिणींवर दुखाचे डोंगर कोसळले आहे. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.




 
			 
		

