Bhabhulgaon :- यवतमाळ-धामणगाव मार्गावरील नांदुरा बु. या गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ७ रोजी दुपारी ३.३० वाजताचे सुमारास घडली. यातील मृत (Dead) पावलेल्या दुचाकीस्वाराचे नांव शिवम दिनेश शिरभाते, (२६) रा. कळंब असे असून तो धामणगावकडे जात होता.
दुचाकी अनियंत्रित झाल्याने ती उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली
या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार, नांदुरा बु. गावाजवळ मागील तीन दिवसांपासून सिमेंट भरलेला १६ चाकी ट्रक क्र. एम.एच.३४.बी.जी.४३८२ तांत्रिक बिघाडामुळे (Technical failure) बंद पडून रस्त्याच्या कडेला उभा करून ठेवलेला होता. आज दुपारी ३.३० वाजताचे दरम्यान शिवम शिरभाते हा युवक कळंबहून बाभूळगाव मार्गे धामणगाव येथे त्याचे व्यावसायिक कामानिमित्त आपली दुचाकी टिव्हीएस रायडर-६६, क्र.एम.एच.२९.सी.एच.३६४५ ने जात होता. दरम्यान नांदुरा गावाजवळ गतीरोधकावरून त्याची दुचाकी अनियंत्रित झाल्याने ती उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. हा अपघात (Accident) इतका जबरदस्त होता की, दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून मोठा रक्तस्त्राव झाला. यात त्याचा जागीच मृत्यु झाला.
घटनेची माहिती मिळताच नांदुरा गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व लागलीच पोलीसांना फोनद्वारे माहिती दिली. पोलीस पाटील युवराज महानूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी अपघाताची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालय बाभूळगाव येथे पाठविण्यात आला