बुलडाणेकरांचा ‘गझल संवाद ‘ला उत्स्फूर्त प्रतिसाद..
बुलडाणा (Ghazal Samvad) : गझलेच्या रुपाने आशयप्रधान गायकीला रसिकमान्यता मिळाली. ह्या प्रवासात माझी धडपड फळाला आली, या गोष्टीचा मला निरंतर आनंद मिळत आहे. याच गझलेने माझे आयुष्य समृद्ध झाले, असे प्रतिपादन गजलनवाज पं. भीमराव पांचाळे यांनी केले. मृणमयी मल्टीपर्पज सोसायटी, सहर- ए- गजल अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गजलसागर प्रतिष्ठान प्रस्तुत ‘गजल संवाद’ (Ghazal Samvad) या कार्यक्रमात पं. भीमराव पांचाळे (Bhimrao Panchale) बोलत होते.
गझलेने मला महाराष्ट्रभर, देशात आणि विदेशातही सफर घडविली. गजलचे खलिफा सुरेश भट साहेबांच्या रूपाने माझ्या जीवनाला झालेल्या परिसस्पर्शामुळे माझे आयुष्य गझलमय झालं अन आयुष्याचं सोनं झालं, अशा साध्या सोप्या शब्दांमध्ये कधी गझलेतील मतला, एखादा शेर सादरीकरण करीत गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी गजलप्रवास आपल्या सुमधूर स्वरांच्या माध्यमातून उलगडून दाखवित बुलढाणेकर रसिकांना (Ghazal Samvad) ‘गजल संवाद’ कार्यक्रमात तब्बल दोन तास खिळवून ठेवले.
गजल संवाद ‘कार्यक्रमाचे आयोजन “मयूरकुंज” येथे सोमवार ४ ऑगस्ट डॉ. वैशाली निकम, डॉ. गजेंद्र निकम, डॉ. गणेश गायकवाड, प्रतिभा गायकवाड, कर्नल सुहास जतकर व रविकिरण टाकळकर यांनी केले होते. तब्बल ५३ वर्षांपासून २ हजारपेक्षा जास्त गजल मैफीलींच्या माध्यमातून गजलनवाज पं. भीमराव पांचाळे यांची गजलयात्रा सुरु आहे. गजल प्रकार रसिकप्रिय आहेच पण नव्या पिढीने या काव्यप्रकारात अधिकाधिक दर्जेदार निर्मिती करण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी सांगितले.
या लिहित्या हातांना बळ देण्यासाठी ‘गझल सागर प्रतिष्ठान ‘च्या माध्यमातून आतापर्यंत १५० गजल लेखन व (Ghazal Samvad) गझल मार्गदर्शन कार्यशाळा , १० गझल संमेलने व गजलेची बाराखडी शिकवणारी १८ पुस्तके प्रकाशित करून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आष्टगाव ता .मोर्शी जि . अमरावती येथे गझलनवाज पं . भीमराव पांचाळे यांच्या मूळगावी सुरेश भट ग्रंथालयाच्या रूपाने गझलेचे समृद्ध विचारपीठ साकारले आहे. या धडपडीतून येणाऱ्या काळात गझल अधिक समृद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदर कार्यक्रमापूर्वी पं. भीमराव पांचाळे यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा संगीत क्षेत्रातील गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी ५ ऑगस्टला या पुरस्काराचे झाले. त्यानिमित्ताने डॉ. गणेश गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली अरविंद टाकळकर, कर्नल सुहास जतकर यांचे उपस्थितित छोटेखानी कार्यक्रमात शहरातील विविध संस्था व व्यक्तींच्या वतीने गझलनवाज भीमराव पांचाळे व सौ. गीताताई भीमराव पांचाळे (Bhimrao Panchale) यांचा सन्मान करण्यात आला.
यात सहर ए गजल आकादमीच्यावतीने डॉ. गणेश गायकवाड, प्रतिभा गायकवाड, मृण्मयी मल्टीपर्पज सोसायटीच्यावतीने लक्ष्मण निकम, संतुबाई निकम, एक्स कारगील सर्व्हिसमन कारपोरेशनच्या वतीने कर्नल सुहास जतकर, बारोमासकार डॉ.सदानंद देशमुख, स्वरसाधनासंगीत विद्यालयाच्यावतीने अरविंद टाकळकर, भाग्यश्री टाकळकर यांनी भिमराव पांचाळे यांचा सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह शाल देवुन यथोचित सन्मान केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रविकिरण टाकळकर यांनी केले .
गझल प्रवासाचे विविध पैलू उलगडताना त्यांनी वली दखणी हा पहिला उर्दू गझलकार होता. १७ व्या शतकात हिंदी, सिंधी, गुजराती आणि नंतर मराठी मध्ये गझल बहरली असे सांगितले. मराठीच्या क्षेत्रात गझलचा प्रवेश उर्दू गझलच्या माध्यमातून झाला असल्याचे सांगून आपण इयत्ता नववी पासून उर्दू शिकायला लागलो. आपला स्वतःचा काहीतरी वेगळा गझल प्रकार असावा, हे मनोमन ठरविले होते. त्या दृष्टीने प्रयत्न केले.तरीही आपल्याला कोणी गझलसम्राट, गझल बादशहा असे म्हटलेले आवडत नाही. गझलने मला नवाजले आहे.
गझल (Ghazal Samvad) हीच माझी ओळख आहे. गझलेला अधिक समृद्ध करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे, नवोदितांना मार्गदर्शन करणे, ही आपली धडपड आहे. चांगला कवी उत्कृष्ट गझलकार होऊ शकतो, असे ते म्हणाले. ‘ गजल संवाद ‘ मध्ये लेखक -साहित्यिक अरविंद शिंगाडे यांनी प्रभावी व खुमासदार शैलीने पं.भीमराव पांचाळे यांना विविध प्रश्न विचारून बोलते केले. कार्यक्रमाला शहरातील पत्रकारिता, प्रशासकीय, राजकीय, सामाजिक ,वैद्यकीय, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.