सोने चांदीच्या दागिण्यांसह रोख केली लंपास!
वर्धा (Burglary) : अज्ञात चोरट्यांनी कुलूपबंद घरांना टार्गेट केले. एकाच रात्री 3 ठिकाणी चोरी झाल्याने एकच खळबळ निर्माण झाली. अज्ञात चोरट्यांनी वरुड येथे एका घरी तर आलोडी परिसरात चोरट्यानी दोन घरी चोरी केली. चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने, रोख रकमेसह दोन दुचाकीसुद्धा चोरून नेल्यात. एका इलेक्ट्रिक दुचाकीची चार्जिंग संपल्याने चोरट्यांनी ती दुचाकी रस्त्यातच सोडून पोबारा केल्याची माहिती मिळते. ईलेक्ट्रिक दुचाकीला जिपीएस प्रणाली असल्याने ती दुचाकी पोलिसांना नागपूर जिल्ह्यातील असोला येथे आढळून आल्याचे सांगण्यात आले.
घरातील साहित्य अस्तव्यस्त होते व कपाटसुद्धा उघडले..
शहरालगतच्या वरुड येथील रत्नाकर सभागृहाच्या मागे राहणार्या प्रेमिला जगताप यांचे घर कुलूपबंद होते. शुक्रवारी 18 जुलै रोजी सकाळी त्या घरी परत आल्यावर त्यांना त्यांच्या घराच्या दाराचे कुलूप तुटलेले आढळून आले. बघितले असता घरातील साहित्य अस्तव्यस्त होते व कपाटसुद्धा उघडले होते. चोरट्यांनी घरातून चपलाकंठी 90 हजार रुपये, मंगळसूत्र 70 हजार रुपये, सोन्याच्या बांगड्या 60 हजार रुपये, रोख 40 हजार, चांदीचे भांडे 15 हजार रुपये आदी दोन लाख 75 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिस ठाण्याचे (Sevagram Police Station) ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.
सेवाग्राम तसेच रामनगर पोलिस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हे दाखल!
2 घटना आलोडी शिवारात उघडकीस आल्या. आलोडी शिवारात सुनीता प्रदीपराव देवरकर घर कुलूपबंद होते. सकाळी परतल्या असताना त्यांना घराच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. अज्ञात चोरट्यांनी (Thieves) दुचाकी, सोन्याचा ऐवज, रोख 3 हजार आदी 29 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. आलोडी शिवारातच प्रकाश अडसुळे यांच्या घरी चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी चांदीचे साहित्य व एक इलेक्ट्रिक चार्जिंग दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी सेवाग्राम तसेच रामनगर पोलिस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हे दाखल (Crimes Filed) करण्यात आलेत. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.