परभणी/गंगाखेड (Parbhani) :- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात अकोली रेल्वे फाटकावर होत असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाची निविदा तात्काळ रद्द करण्याची मागणी करत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सोमवार ३ फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात आंबेडकरी अनुयायांनी दिला आहे.
परभणीच्या गंगाखेड आंबेडकरी अनुयायांचे निवेदन
गंगाखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातुन जाणाऱ्या रेल्वे रुळावर असलेले अकोली रेल्वे फाटक दिवसांतून अनेक वेळा बंद होऊन वाहतूक (Transportation) ठप्प होत असल्यामुळे येथे उड्डाणपुल करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. यावरून राज्य शासनाने अकोली रेल्वे फाटकावर उड्डाणपुल उभारण्यास मंजुरी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने (Construction Department) रेल्वे उड्डाणपुल उभारण्याची प्रक्रिया सुरु केली तेंव्हा परभणी ते परळी दरम्यान रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेतल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून जाणारे व सध्या कार्यरत असलेले रेल्वे रूळ काढून येथून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून नवीन रेल्वे रूळ टाकले जाणार असल्याचे सांगत भविष्यात अकोली रेल्वे फाटक राहणार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व चौकाचे विद्रुपीकरण होणार
यामुळे येथे रेल्वे उड्डाणपुल उभारण्याची आवश्यकता नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला २५ जुलै २०२४ रोजी दिलेल्या पत्रात स्पष्ट केले होते. असे असतांना सुद्धा काही राजकीय पुढारी व कंत्राटदारांशी संगणमत करून रेल्वे उड्डाणपुलाची आवश्यकता नसतांना सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी रेल्वे विभागाच्या पत्राकडे दुर्लक्ष करीत उड्डाणपुलाची निविदा काढली. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व चौकाचे विद्रुपीकरण होणार असुन आंबेडकरी अनुयायी हे कदापी सहन करणार नाही असे झाल्यास समस्त आंबेडकरी अनुयायी व बहुजन समाज रस्त्यावर उतरून ना भूतो ना भविष्यतो आंदोलन छेडतील असा इशारा देत सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेली अकोली रेल्वे फाटकावरील रेल्वे उड्डाणपुलाची निविदा तात्काळ रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे नांदेड येथील मुख्य अभियंत्यांसह परभणी जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता परभणी, गंगाखेड तहसीलदार, उपविभागीय अभियंता आदींना देण्यात आले आहे.
या निवेदनावर माजी नगरसेवक चंद्रकांत खंदारे, रमाकांत घोबाळे, विकास रोडे, रोहिदास लांडगे, भिमराव कांबळे, महाविर घोबाळे, व्यंकटेश मोरे, सय्यद बिलाल आदींसह बहुसंख्य बहुजन समाज बांधव तसेच आंबेडकरी अनुयायांच्या स्वाक्षऱ्या असुन या भागातील व्यापाऱ्यांनी याप्रसंगी उपस्थित राहून यास पाठींबा दर्शविला आहे.