बालकांच्या गप्पात रंगून साधला संवाद!
हिंगोली (CEO Anjali Ramesh) : वसमत तालुक्यातील 4 अंगणवाड्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी शुक्रवारी 11 जुलै रोजी भेटी देऊन पाहणी केली. यावेळी अंगणवाडीतील बच्चे कंपनीसोबत त्यांनी पोषण आहाराची (Nutritional Diet) चवही घेतली. तसेच बालकांशी गप्पाही मारल्या. यावेळी अंगणवाडीमध्ये (Anganwadi) सोलार यंत्र बसविण्याच्या सूुचना त्यांनी केल्या.
अंगणवाड्यांचा एक समान रंगाचा उपक्रम!
हिंगोली जिल्हयात सुमारे 1 हजार अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमधून बालकांना पोषण आहार दिला जातो. या शिवाय पुर्व प्राथमिक अभ्यासक्रम देखील शिकविला जातो. हसत खेळत शिक्षणाचा आनंद बालके घेतात. तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ यांनी अंगणवाड्यांचा एक समान रंगाचा उपक्रम हाती घेतला होता. त्यानुसार अंगणवाड्यांची एक समान रंगाने रंगरंगोटी करण्यात आली. दरम्यान, अंगणवाडीच्या योजनांची अंमलबजावणी व बालकांना दिला जाणारा आहार यासह कामकाजाची माहिती घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी शुक्रवारी 11 जुलै रोजी वसमत तालुक्यात आरळ येथील दोन तर बाराशिव व आसेगाव येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी विजय बोराटे, प्रकल्प अधिकारी प्रिया लखमोड, पर्यवेक्षिका पल्लवी राठोड, प्राजक्ता रनेर यांची उपस्थिती होती.
बालकांना पोषण आहार देतांना व्यवस्थित काळजी घेण्याच्या सूचना!
यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी अंजली रमेश (Chief Executive Officer Anjali Ramesh) यांनी अंगणवाडीच्या इमारतीची पाहणी केली. अंगणवाडीत ठेवण्यात आलेल्या धान्याची साफसफाई, धान्य ठेवण्याची जागा याची पाहणी केली. त्या ठिकाणी साफसफाई ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या शिवाय बालकांची उंची व वजन नियमितपणे घेऊन त्यांची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदी ठेवण्याच्या सूचना दिल्या. बालकांना पोषण आहार देतांना व्यवस्थित काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांनी काही नोंदी तपासल्या. अंगणवाडीत विज पुरवठा (Power Supply) नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी केली. मात्र देयका अभावी विज पुरवठा खंडीत असल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी तातडीन सौरउर्जेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी बालकांसोबत बसून गप्पाही मारल्या. तसेच पोषण आहाराची चवही चाखून बघितली.