Chamorshi :- चामोर्शी येथील लक्ष्मी गेट चौकाजवळ आज २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या भीषण अपघातात (Accident)शाकिर शेख हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीस्वाराला दिली धडक
प्राथमिक माहितीनुसार, सुरजागडवरून लोहखनिज घेऊन गडचिरोलीकडे जात असलेल्या एम. एच. ३४ बि.झेड. ४३७७ च्या क्रमांकाच्या ट्रकने लक्ष्मी गेट जवळील चौकातून रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीस्वाराला धडक दिली. या धडकेत दुचाकी ट्रकच्या मागच्या चाकाजवळील पल्याला आपटल्याने शाकिर शेख खाली पडून गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील कर्मचारी व होमगार्ड दासरवार यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत जखमीला अॅम्बुलन्सच्या सहाय्याने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे रवाना केले. पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे अपघातानंतर ट्रकचालकास पळ काढता आला नाही; त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.




