मुख्यमंत्र्यांच्या पथदर्शी प्रकल्पामुळे आदिवासीनुरूप आरोग्य सेवा थेट जंगलात
गडचिरोली (Tribal Health Care) : गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आरोग्यसेवेचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि स्वयंसेवी संस्था ‘सर्च’ (सोसायटी फॉर एज्युकेशन, अॅक्शन अँड रिसर्च) यांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी व्यापक मोहीम राबवून आदिवासी भागात आरोग्याचे एक नवे मॉडेल तयार केले आहे. येथील दुर्गम भागात आता थेट मोबाईल मेडिकल युनिट पाठवले जाऊ लागले आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही राज्याच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. (Tribal Health Care) नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोलीत आरोग्यसेवा थेट जनतेच्या दारात पोहोचत आहे.
ज्या दुर्गम भागांत पारंपरिक आरोग्यसेवा पोहोचू शकली नव्हती, तिथे आता शासनाचे ‘मोबाईल मेडिकल युनिट’ धाव घेत आहे. एके काळचा धानोरा तालुका हा देशातील अतीमागास, नक्षलग्रस्त आणि आरोग्यसेवेपासून वंचित असा भाग मानला जातो. याच धानोरा तालुक्यातील ७० गावांतील आदिवासी नागरिकांना त्यांच्या दारातच डॉक्टरांकडून तपासणी, औषधे आणि उपचार मिळत आहेत. 
मोफत आरोग्यसेवेच्या या (Tribal Health Care) उपक्रमामुळे गावकर्यांच्या चेहर्यावर दिलासा आणि विश्वासाचे हास्य उमटले आहे. यातून आरोग्य विभाग आणि आशा सेविकांच्या सहकार्याने आदिवासी भागासाठी एक नवे आरोग्य मॉडेल तयार झाले असल्याचे दिसून येते. ‘सर्च’ संस्थेच्या आशा सेविकांना आता नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळत आहे. धानोरा तालुक्यातील १८१ आशा सेविकांना वर्षातून तीन वेळा सर्चच्या तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते.
अधिकारी ते आशा-सर्वांसाठी संयुक्त प्रशिक्षण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच एक अभिनव करार करण्यात आला असून, (Tribal Health Care) सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सर्च संस्थेत प्रत्यक्ष दोन दिवस प्रशिक्षण घेणार आहेत. उच्चपदस्थ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि आशा सेविका या सर्वांना एकत्र बसवून प्रशिक्षण देण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच क्रांतिकारी पद्धत ठरली आहे. याद्वारे खेड्यांमध्ये आरोग्याच्या त्रिस्तरीय सेवा राबविण्याचे हे पथदर्शी उदाहरण आहे.
भविष्यात या भागात आदिवासी संस्कृतीनुरूप आरोग्यसेवा विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे. गडचिरोलीत सुरू झालेली ही आरोग्य चळवळ म्हणजे खर्या अर्थाने आरोग्य क्रांतीची नवी पहाट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमुद केले आहे.




 
			 
		

