गोरगरिबांच्या जगण्याची धडपड चिमुकलीने मांडली समाजापुढे!
लातूर (Child Labour) : आपल्याला व आपल्या कुटुंबाला दोन घास मिळावेत, यासाठी दोरीवरची कसरत करीत डोंबारी खेळ दाखवणाऱ्या चिमुकलीने लातूरकरांचे लक्ष वेधले. हा खेळ मांडतानाच या चिमुकलीने गोरगरिबांच्या जगण्याची धडपड समाजापुढे मांडली. लातूर शहरातील मिनी मार्केट परिसरात काल एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले. अवघ्या दहा–अकरा वर्षांची एक चिमुकली, एका हातात काठी आणि दुसऱ्या हाताने तोल सांभाळत, उंच दोरीवर डोंबारी खेळ दाखवते. तिच्या कसरती पाहून तेथील नागरिक खुश झाले, अनेकांनी टाळ्यांच्या गजरात तिचे कौतुक केले. काहींनी तिच्या मेहनतीला दाद देत थोडीफार मदतही केली. मात्र या दृश्यामागे दडलेली वास्तवाची वेदना अनेकांच्या मनाला भिडली. ज्या वयात या चिमुकलीने शाळेत जाऊन शिक्षण घ्यायला हवे, पुस्तकात रमावे, त्या वयात ती पोटाच्या खळगीसाठी, रस्त्यावर जीव धोक्यात घालून कसरती करत होती. तिच्या चेहऱ्यावरचे हसू आणि डोळ्यांत दडलेले संघर्षाचे सावट, हे चित्र समाजाला आरसा दाखवणारे ठरले.
चिमुकलीची कसरत फक्त दोरीवरची नव्हे, तर आयुष्याशी लढण्याची!
आपण “विकसित भारत” घडवण्याचे स्वप्न पाहतो, पण हाच भारत आजही अशा मुलांना शिक्षणाऐवजी उपजीविकेच्या संघर्षात ढकलत आहे, हीच खरी शोकांतिका आहे. बालकामगार, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव, हे प्रश्न अजूनही आपल्याला मागे खेचत आहेत. या चिमुकलीची कसरत फक्त दोरीवरची नव्हे, तर आयुष्याशी लढण्याची होती. तिच्या प्रत्येक पावलात आत्मविश्वास होता, पण तिच्या संघर्षात समाजाची उदासीनता दडलेली होती.
समाजातील प्रत्येक घटकाने अशा मुलांना सुरक्षित बालपण, शिक्षण आणि सन्मानाचा अधिकार मिळावा यासाठी पुढे यायला हवे. कारण त्या चिमुकलीचे स्वप्न फक्त पोट भरण्यापुरते नव्हे तर आपल्या आयुष्य उभे करण्याचे आहे, हे समाजातल्या जाणकार व दानशुरांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. सरकारने याकडे ‘स्टार्टअप किंवा आत्मनिर्भर भारत’, असे म्हणून न पाहता आपल्या देशातील खचलेल्या वर्गाचे प्रतिनिधी म्हणून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.
Child Labour: तिची जगण्याची लढाई, दोरीवरची कसरतच!
 
			



 
		

