दारव्हा (Municipal Council ) : नगर परिषद दारव्हा कार्यालयाच्या विविध योजनेतून पूर्ण केलेल्या बांधकामांचे देयक अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्यामुळे कंत्राटदार गोविंद राठोड आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. वारंवार लेखी आणि मौखिक विनंती करूनही देयके न मिळाल्यामुळे कंत्राटदारांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कंत्राटदार गोविंद राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, (Municipal Council) करारनाम्यानुसार पूर्ण करण्यात आलेल्या बांधकामांच्या देयकाची रक्कम अद्याप त्यांना मिळालेली नाही. यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा निषेध म्हणून त्यांनी प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीपासून प्राणत्याग सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
राठोड यांनी नगर परिषद प्रशासनाला (Municipal Council) नोटीस पाठवून यासंदर्भात कळविले आहे. त्यांनी प्रशासनावर वेळेत देयके न काढल्याचा आरोप करत आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले. प्रशासनाने तातडीने देयकांची प्रक्रिया सुरू न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या मुद्द्यावर नगर परिषद प्रशासनाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




