औराद वाळू उपशा

औरादमध्ये वाळू उपशाच्या 'बोटी' कुणाच्या बरे 'घशात'! 

Aurad Sand Upsha: औराद शहाजानीत अवैध वाळू उपशामुळे नदीचे काट व शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होत आहे, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप.

औरादमध्ये वाळू उपशाच्या 'बोटी' कुणाच्या बरे 'घशात'! 

Aurad Sand Upsha

राजरोस वाळू उपशामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, प्रशासन बसलं गप्प-गुमान!

औराद शहाजानी (Aurad Sand Upsha) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात राजरोस बोटींद्वारे वारेमाप अवैध वाळू उपसा केला जात असून यामुळे नद्यांचे काट धोक्यात आले आहेत. 
मांजरा व तेरणा नदीच्या संगमासह तेरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वाळू उपशामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असले तरी प्रशासन मात्र गप्प-गुमान बसले आहे.

स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून वाळू उपशावर बंदी असतानाही प्रत्यक्षात दिवसा व रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी सुरू आहे. मध्यरात्रीनंतर ते पहाटेपर्यंत ट्रॅक्टर, टिप्पर आणि इतर वाहनांच्या सहाय्याने ही वाहतूक केली जात असून ती अत्यंत नियोजनबद्ध आणि वेगाने केली जात असल्याने महसूल व पोलीस प्रशासनाच्या नजरेतून सुटत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, तेरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे (Aurad Sand Upsha) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार तहसीलदार कार्यालयाकडे करण्यात आली आहे. वेगळी येथिल गट क्रमांक ७५ मधील शेतजमिनीच्या लगत काही अज्ञात व्यक्तींमार्फत बोट व यंत्रांच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असून त्यामुळे नदीपात्रातील वाळू व माती शेतजमिनीकडे सरकत आहे. परिणामी सुपीक माती वाहून जात असून पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

या संदर्भात शेळगी (ता. निलंगा) येथील शेतकरी श्रीमती कलावती लक्ष्मणराव जाधव व श्री. महादु शिवाजीराव जाधव (म्हेकरे) यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदन देत आपली व्यथा मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सततच्या अवैध उत्खननामुळे शेतजमिनीची धूप वाढली असून भविष्यात शेती करणेही कठीण होण्याची भीती निर्माण झाली आहे. यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नसल्याने वाळू माफियांचा धुमाकूळ वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नदीपात्रालगत शेती करणाऱ्या इतर शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. सततच्या वाळू उपशामुळे नदीचे नैसर्गिक स्वरूप बदलत असून पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे. यामुळे विहिरी व बोअरवेल कोरड्या पडण्याचा धोका निर्माण झाला असून शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासोबतच पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची भीतीही वाढत आहे. नदीपात्रातील बदलांमुळे पूरस्थितीत धोका वाढण्याची शक्यता असून जैवविविधतेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी ही वाळू वाहतूक जीवघेणी ठरत आहे. (Aurad Sand Upsha) भरधाव वेगाने धावणारी वाहने रस्त्यावरून जात असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्याच्या कडेला चालावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकाराकडे पोलीस व महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही नागरिकांनी तर वाळू माफियांना प्रशासनाचे अप्रत्यक्ष पाठबळ मिळत असल्याची शंका व्यक्त केली आहे.

“वाळू उपसा बंद (Aurad Sand Upsha) असताना नदीपात्रातून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू कशी कमी होते?” असा सवालही उपस्थित केला जात आहे. स्थानिक शेतकरी, नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून अवैध वाळू उपसा पूर्णपणे बंद करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात शेती, पर्यावरण आणि नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

संबंधित सामग्री

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

निलंगा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींसह ७०० ब्रास वाळू आणि ४५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

Sep 22, 2026
सेनगाव तालुक्यात पकडले अवैध रेतीचे दोन टिप्पर

सेनगाव तालुक्यात पकडले अवैध रेतीचे दोन टिप्पर

Sengaon Illegal Sand Mining: सेनगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन प्रकरणी पोलिसांनी दोन टिप्पर पकडून गुन्हे दाखल केले.  सेनगाव तालुक्यातील पाटोदा संत सेवालाल महाराज चौक व म्हाळसापूर शिवारामध्ये...

Sep 06, 2026
माऊलीच्या गर्भातील स्पंदनं अन् आसरा देणारी झोळीही शांत झाली

माऊलीच्या गर्भातील स्पंदनं अन् आसरा देणारी झोळीही शांत झाली

ज्या देशात आज तंत्रज्ञान आणि विकासाच्या गप्पा मारल्या जातात, त्याच देशातील एका कोपऱ्यात एका गर्भवतीच्या आक्रोशाने नात्यांची अन् संवेदनशीलतेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

Aug 27, 2026
परभणीत गुंजच्या गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणारे ७ ट्रॅक्टर जप्त...?

परभणीत गुंजच्या गोदापात्रात अवैध वाळू उपसा करणारे ७ ट्रॅक्टर जप्त...?

Parbhani Illegal sand mining: परभणीत गुंज शिवाराच्या पांढरपानी नद्यापात्रात अवैध वाळू उत्खनन करत असलेल्या सात ट्रॅक्टरांच्या मालकीवर ६० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Aug 21, 2026