शंकरपूर येथील धक्कादायक घटना; रमेश बनकर यांचा जागीच मृत्यू, आरोपी मोठा भाऊ जगन बनकर पोलिसांच्या ताब्यात
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे मटणावरून झालेल्या वादाचा भयंकर शेवट झाला. सख्ख्या भावांमध्ये सुरू झालेल्या किरकोळ वादातून मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात रमेश श्रीराम बनकर (वय ५५) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी भिसी पोलिसांनी आरोपी जगन श्रीराम बनकर (वय ६०) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगन, रमेश आणि त्यांचा दिव्यांग भाऊ किशोर हे तिघे भाऊ एकत्र राहत होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांची बहीण घरी आली होती. तिच्या स्वागतासाठी घरात मटणाचा बेत करण्यात आला होता. बहीण राखी बांधून घरी परतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उरलेल्या मटणावरून जगन आणि रमेश यांच्यात वादाला सुरुवात झाली.
दोघेही दारूच्या नशेत असल्याने सुरुवातीचा शाब्दिक वाद काही वेळातच वाढत गेला. त्यानंतर संतापलेल्या जगनने घरातील कुऱ्हाड हातात घेत रमेश यांच्या मानेवर आणि डोक्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले रमेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. कुऱ्हाडीचे वार गंभीर असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भिसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली.
दरम्यान, भिसी पोलीस आणि शंकरपूर चौकीच्या पोलिसांनी कारवाई करत आरोपी जगन बनकर याला अटक केली. मटणासारख्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचल्याने शंकरपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भिसी पोलीस करत असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.