सुधारित पिक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ!
मानोरा (Crop Insurance Scheme) : शासनाने 1 रुपयात पिक विमा योजना (Crop Insurance Scheme) बंद करून नवीन सुधारित पिक विमा योजना अंमलात आणली आहे. परंतु ही नवीन योजना शेतकऱ्यांना पसंत पडली नसल्याने या योजनेला मानोरा तालुक्यात फारच अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. सुधारित पिक विमा शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत काढता येणार आहे.
शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढताना अडचणी!
काही शेतकरी पिक विमा काढण्याकरिता गर्दी करताना दिसत आहे. मात्र यामध्ये शासनाने अनेक अटी लादल्यामुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पिक विमा काढण्याकरिता फार्मर्स आयडी अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्याने नव्याने शेती घेतली. त्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी (Farmer ID) काढताना अडचणी येत आहे. यावर्षी खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी 1 जुलै पासून सुरुवात झाली असुन अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत देण्यात आलेली आहे. मागील 3 वर्षे शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा काढता आला. मात्र यावर्षी ही योजना बंद करण्यात आली असून, शेतकऱ्यांना (Farmers) पूर्वीप्रमाणेच रक्कमेचा भरणा करून पिक विमा काढावा लागणार आहे.