ऐन दिवाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात नाराजीचे “फटाके”
वर्धा (MLA Suresh Deshmukh) : आम्ही शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलो. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाल्यानंतर देखील आम्ही शरद पवार यांच्या सोबतच राहिलो. मात्र पक्षाच्या वतीने सातत्याने डावलण्याची भूमिका घेण्यात आली. आता मात्र अतिच झाले असून पक्षाला आमची गरज आहे की नाही हाच प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही पक्षात राहायचे की नाही, हे ठरवण्याची वेळ आता आली आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून दिवाळीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख (MLA Suresh Deshmukh) यांनी सांगितले. यामुळे ऐन दिवाळीत वर्ध्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये राजकीय फटाके फुटू लागले आहेत.
वर्ध्यातील बुटीवाडा येथे माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख (MLA Suresh Deshmukh) यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. यावेळी पक्षाकडून मिळत असलेली सापत्न वागणूक, मामा – भाच्याची कटकारस्थाने यावर सडेतोड भाष्य करत माजी आमदार सुरेश देशमुख यांनी पक्षाकडून मिळणारे वागणुकीबाबत संताप व्यक्त केला. पक्षाकडून सातत्याने टाळण्यात येत आहे. लोकसभेच्या वेळी समीर देशमुख यांच्याकरिता उमेदवारी मागितली होती. मात्र त्यावेळी उमेदवार आयात करून काँग्रेसचे अमर काळे यांना उमेदवारी दिल्या गेली. त्यानंतर विधानसभेच्या वेळी उमेदवारी मागितली.
मात्र त्यावेळी देखील डावलण्याचा प्रकार झाला. जिल्हाध्यक्ष निवडताना देखील विश्वासात घेण्यात आले नाही. आम्ही समीर देशमुख यांचे नाव सुचविले होते. मात्र पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले. जिल्हाध्यक्षाची निवड करताना विचारल्या देखील गेले नाही. आमच्याकडे कानाडोळा करून हिंगणघाटचे अतुल वांदिले यांना जिल्हाध्यक्ष करण्यात आले. विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला असून अतुल वंदिले यांना जिल्हाध्यक्षपदी निवडण्यात आले. समीर देशमुख यांना मात्र दुर्लक्षित करण्यात आले. पक्षाकडून सातत्याने हा अन्याय होत आहे. अनिल देशमुख आणि खासदार अमर काळे यांच्याकडून पक्षामध्ये निर्णय घेतले जातात. त्यात सहकार गटाला डावलण्यात येते. त्यामुळे आता एकदा काय ती भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. पक्षात राहायच किंवा नाही.
कारण कार्यकर्ते देखील विचारणा करतात. त्यांना कसे सांभाळायचे हा प्रश्न आहे. सहकार क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे दिवाळीच्या नंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यामध्ये चर्चा करत पक्षात राहायची किंवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल असा इशाराच माजी आमदार सुरेश देशमुख यांनी दिला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना जिल्ह्याची संपूर्ण माहिती आहे. तरी सुद्धा हा प्रकार होतों आहे. मी या बाबत प्रदेशाध्यक्ष शिंदे यांच्याशी बोलून नाराजी दाखवल्याचे सुरेश देशमुख यांनी सांगितले.
यापूर्वी जिल्हाध्यक्ष म्हणून सुनील राऊत यांनी जवळपास 18 वर्षे कार्यभार सांभाळला. मात्र त्यांच्या कार्यकाळात ते फारसा पक्षाचा विस्तार करू शकले नाही. पक्ष मर्यादितच राहिला. पक्षाचा फारसा विस्तार होत नसल्याने तसेच त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. मात्र सुनील राऊत यांना तब्बल 18 वर्षापर्यंत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. आता मात्र त्यांना या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले.
अतुल वांदिले यांनी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवली. त्यामध्ये पराभव झाला असला तरी अनेक आंदोलनांच्या माध्यमातून ते लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. अतुल वांदिले यांची निवड झाल्यानंतर सहकार गटाला चांगला धक्का बसला. त्यामुळे आता राजकीय फटाके दिवाळीच्या वेळेस शरद पवार गटामध्ये फुटण्याची चिन्ह दिसून येत आहे.
माजी आमदार सुरेश देशमुख यांचे शरद पवार यांच्यासोबत अतिशय निकटचे संबंध आहेत. शरद पवार यांच्यासोबत सुरेश देशमुख एकनिष्ठ राहिलेत. मात्र आता त्यांना डावलण्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडच्या काळात अनेक समीकरणे बदलली आहेत. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट म्हणजे सुरेश देशमुख यांचा गट असा प्रभाव होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये अनेक नेते मंडळी समावेशित झाली आहे. त्यामुळे आणखी काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
खासदार अमर काळे यांनी निवडणूक लढताना काँग्रेस सोबत असल्याचे सांगितले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेले त्यांना मोठी जबाबदारी आलेली आहे. काँग्रेस मध्ये देखील आर्वी विधानसभा मतदारसंघात नवे पर्याय निर्माण होऊ लागले आहेत.
आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात वर्धा जिल्ह्यात मोठी उलथा पालथ पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. याचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.