७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मोदींनी सांगितला २५ वर्षांचा प्रवास
नवी दिल्ली: सार्वजनिक जीवनात सरकारप्रमुख म्हणून सलग २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजकीय आणि प्रशासकीय प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापासून सुरू झालेला हा प्रवास जनतेच्या विश्वासामुळे आणि आशीर्वादामुळे शक्य झाल्याचे मोदी यांनी म्हटले. नवी दिल्लीतील आपल्या भाषणात त्यांनी भारताची लोकशाही, संविधान आणि जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू, अशी अपेक्षा आपण कधी केली नव्हती, असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. गेल्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाकडे व्यक्तिगत उपलब्धी म्हणून न पाहता, देशसेवेची संधी म्हणून पाहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
25 years of serving the people... I bow to 140 crore Indians for their trust and look forward to serving the nation with greater commitment in the times to come. https://t.co/rO1LXY9Csm
— Narendra Modi (@narendramodi) October 7, 2026
‘देशासमोर सत्ता सुखाला कोणतेही महत्त्व नाही’
देशाचा प्रश्न येतो तेव्हा पद, प्रतिष्ठा आणि अधिकार यांना कोणतेही महत्त्व राहत नाही, असे मोदी यांनी सांगितले. त्यांच्या मते, जगाच्या कोणत्याही भागात पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते; मात्र भारतासारखी पुण्यभूमी मिळणे ही वेगळीच गोष्ट आहे.
गेल्या २५ वर्षांचा प्रवास अनेक जण उपलब्धी म्हणून पाहतात, मात्र त्यात वैयक्तिक महिमामंडन करण्यासारखे काही नसल्याचे मोदी म्हणाले. वयाच्या २५व्या वर्षी जंगल आणि आदिवासी भागात सेवा करण्याचा अनुभव आपल्या जीवनाला वेगळी दिशा देणारा ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
‘महत्त्वाकांक्षेसाठी नव्हे, मिशनसाठी जगलो’
आपला राजकीय प्रवास प्रामुख्याने संघटनात्मक स्वरूपाचा होता, असे पंतप्रधानांनी सांगितले. निवडणुकीच्या राजकारणात स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा असती तर त्यापूर्वीच निवडणुकीच्या मैदानात उतरलो असतो, मात्र तसा स्वभाव नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वतःच्या भवितव्याचा विचार करण्यापेक्षा मिळालेली जबाबदारी पूर्ण करण्यावर भर दिला. महत्त्वाकांक्षेपेक्षा मिशनला प्राधान्य देत देशाची सातत्याने सेवा करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय राहिले, असे मोदी यांनी सांगितले.
कर्माला त्यांनी कर्तव्य मानले असून देशासाठी केलेले काम हीच साधना असल्याचे त्यांनी म्हटले. देश आणि देशवासीयांसाठी काम करणे कधीही थांबता कामा नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘जनतेच्या चरणी नतमस्तक’
२५ वर्षांचा हा टप्पा जनतेच्या आशीर्वादाचे फलित असल्याचे सांगत मोदी यांनी भारतीय जनता पक्षासोबतच NDAवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले.
मोदी यांनी सांगितले की, सकाळी त्यांनी १.४ अब्ज देशवासीयांसाठी प्रार्थना केली आणि भारतासाठी आणखी जोमाने काम करण्याची तसेच देशवासीयांची सेवा करण्याची शक्ती मिळावी, अशी देवाकडे प्रार्थना केली.
‘माझ्यासाठी लोकच देव’
आपल्या आजच्या स्थानापासून मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीपर्यंत जनतेचे योगदान सर्वाधिक असल्याचे मोदी यांनी म्हटले. ‘माझ्यासाठी लोकच देव आहेत’, असे सांगताना देशाने आपल्याला खूप काही दिले असून त्यामुळे देशाप्रती आपली जबाबदारीही मोठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकांनी आपल्याला संसाधने मर्यादित असली तरी धैर्य आणि स्वप्ने मोठी ठेवण्याचा धडा दिल्याचेही मोदी म्हणाले.
#WATCH | PM Narendra Modi offers prayers at Sri Vinayaka Mandir in Delhi The PM has completed 25 years in public life today. (Video source: DD) https://t.co/voCCtYx2Oe
— ANI (@ANI) October 7, 2026
बुद्धापासून विवेकानंदांपर्यंतच्या विचारांचा उल्लेख
भारताची विचारपरंपरा आणि आध्यात्मिक वारशाचाही मोदी यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. बुद्धापासून स्वामी विवेकानंदांपर्यंतच्या विचारधारेचे पालन करणाऱ्या राष्ट्राची सेवा करताना कधीही एकटेपणा जाणवला नाही, असे त्यांनी सांगितले.
संघटनेतील स्वयंसेवकांकडून मिळालेल्या सहकार्याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. मानवतेची सेवा करणे हा आपल्या कार्याचा आधार असल्याचे सांगताना गरीब आणि गरजूंची मदत करणे हे अविचल कर्तव्य असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.