आईने मुलीचा ताबा मिळवण्यासाठी दाखल केली होती याचिका; तरुणासोबत राहण्याची मुलीची इच्छा न्यायालयाने मान्य केली
प्रौढ झाल्यानंतर व्यक्तीला स्वतःच्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आहे, हे अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. मुलांना पालकांची खासगी मालमत्ता मानता येणार नाही आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना स्वतःजवळ ठेवण्याचा अधिकार पालकांना नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. एका आईने आपल्या प्रौढ मुलीचा ताबा मिळवण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली.
नेमकं प्रकरण काय?
नागपूरमधील संबंधित मुलगी १७ वर्षांची असताना शिक्षणासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर ती एका तरुणासोबत निघून गेली. पोलिसांनी तिचा शोध घेतल्यानंतर तिला आईकडे परत आणण्यात आले होते. मात्र, वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या मुलीने पुन्हा स्वतःच्या इच्छेने घर सोडले आणि ती त्याच तरुणासोबत राहण्यासाठी निघून गेली.
यानंतर मुलीचा ताबा मिळवण्यासाठी तिच्या आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मुलीशी प्रत्यक्ष संवाद साधून तिची भूमिका जाणून घेतली.
न्यायालयासमोर मुलीने आपण स्वतःच्या इच्छेने आईची साथ सोडल्याचे स्पष्ट केले. तसेच, संबंधित तरुणासोबतच राहण्याची आपली इच्छा असल्याचे तिने सांगितले. तिची इच्छा आणि कायदेशीर वय लक्षात घेऊन न्यायालयाने तिच्या निर्णयाला मान्यता दिली.
प्रौढ व्यक्तीला जीवनसाथी निवडण्याचा अधिकार
मुलगी आता १८ वर्षांची असून कायद्यानुसार ती प्रौढ आहे. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याबाबत निर्णय घेण्यास आणि आपल्या पसंतीचा जीवनसाथी निवडण्यास ती स्वतंत्र असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
मुलांच्या ताब्याशी संबंधित प्रकरणांमध्ये केवळ पालकांचा अधिकार महत्त्वाचा नसून संबंधित मुलाची इच्छा आणि कल्याण यांनाही प्राधान्य दिले जाते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मुलीने स्वतःच्या इच्छेने तरुणासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने तिचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचे सिद्ध होत नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाने आईची याचिका फेटाळून लावली. तसेच प्रौढ मुलीला आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याचे स्वातंत्र्य असल्याचे स्पष्ट केले.